आदित्य ठाकरेंनी केले प्रफुल्ल पटेल, विश्वजीत कदम आणि श्रीमंत छत्रपती मालोजीराजेंना कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 07:23 PM2021-10-30T19:23:40+5:302021-10-30T19:40:21+5:30
यावेळी फोटोग्राफी कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थ ठेवण्यात आलेला अत्याधुनिक कॅमेरा हाताळण्याचा मोह आदित्य ठाकरे यांना आवरता आला नाही
धनकवडी: महाराष्ट्रात ठाकरे घराणे कलाप्रेमी म्हणून ओळखले जाते. बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार तर उद्धव ठाकरे छायाचित्रकार ! या दोघांचाही वारसा राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे आल्याची प्रचिती भारती विद्यापीठ येथील फोटोग्राफी कॉलेजला त्यांनी भेट दिली असताना आली.
यावेळी फोटोग्राफी कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थ ठेवण्यात आलेला अत्याधुनिक कॅमेरा हाताळण्याचा मोह आदित्य ठाकरे यांना आवरता आला नाही. त्यांनी आपल्या सोबत उपस्थित असलेल्या खासदार प्रफुल्ल पटेल, भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम आणि श्रीमंत छत्रपती मालोजीराजे यांची प्रसन्न भावमुद्रा या कॅमेऱ्याने टिपण्याचा आनंद घेतला.
स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार करणे आणि कालचा, आजचा विचार करण्यापेक्षा उद्याचा विचार करणे देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे, असे मत राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. भारती हॉस्पिटलमध्ये नवीन तीन टेस्ला एमआरआय मशिन व १२८ स्लाईस आणि ३२ स्लाईस सी.टी. स्कॅन अद्ययावत सेंटरचे उदघाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर खासदार प्रफुल्ल पटेल, भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, श्रीमंत छत्रपती मालोजीराजे, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, भारती विद्यापीठ मेडिकल फौंडेशनच्या कार्यकारी संचालिका डॉ.अस्मिता जगताप उपस्थित होत्या.