Aditya Thackeray: "छोटा पप्पू" म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांना आदित्य ठाकरेंचं जशास तसं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 01:24 PM2022-10-28T13:24:44+5:302022-10-28T13:24:55+5:30
अब्दुल सत्तार म्हणाले की, राजकारण वेगळं आहे. तुम्ही कॅबिनेट मंत्री, तुमचे वडील मुख्यमंत्री आणि २०२१ मध्ये हा प्रकल्प गुजरातला जातो.
पुणे - आदित्य ठाकरेंनी टाटांचा प्रकल्प बाहेर कसा गेला? तारीख कोणती होती? हे बारकाईनं पाहिलं तर २१ सप्टेंबर २०२१ मध्ये हा प्रकल्प राज्यातून गेला. त्यावेळेला मुख्यमंत्री त्यांचे वडील होते. जे बोलतायेत ते कॅबिनेट मंत्री होते. मग या प्रकल्पात काही देवाणघेवाण झाली नाही म्हणून हा प्रकल्प राज्याबाहेर गेला? अशी शंका लोकांमध्ये आहे. छोटा पप्पू पहिले बोलले असते तर आज ही वेळ आली नसती असं सांगत मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. छोटा पप्पू म्हणत सत्तारांनी आदित्य ठाकरेंना चिडवलं होतं. आता, आदित्य यांनी सत्तारांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
अब्दुल सत्तार म्हणाले की, राजकारण वेगळं आहे. तुम्ही कॅबिनेट मंत्री, तुमचे वडील मुख्यमंत्री आणि २०२१ मध्ये हा प्रकल्प गुजरातला जातो. आपल्यावरील खापर दुसऱ्याच्या माथी मारायचं. हे सर्व पाप २०२१ मधील आहे. एकनाथ शिंदे २०२२ मध्ये मुख्यमंत्री झाले. लोकांमध्ये दिशाभूल निर्माण करायचं. संभ्रमाचं वातावरण बनवायचं असं राजकारण केले तर दुसरे पप्पू म्हणून यांची जागा कुठे असेल सर्वांना माहिती आहे, अशा शब्दात सत्तार यांनी आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केली होती. आता, आदित्य यांनीही सत्तारांना जशास तसे उत्तर दिलं आहे.
मी त्यांच्यासोबत बसत नाही, आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जे विचारलं ते मी करत नाही. म्हणून त्यांना वाईट वाटत आहे, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी अब्दुल सत्तार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.
तसेच, काल खातेवाटप वेगळं झालेलंय, उद्योगमंत्र्यांनी शेतीबद्दल ट्विट केलंय, कृषीमंत्र्यांनी एक्साईजच्या विषयाला हात घातलेला आहे. आज राज्यातील शेतकऱ्यांना कृषीमंत्री कोण हे माहिती नाही कारण बांधावर कोणी आलंच नाही. उद्योगमंत्री कोण हे उद्योजकांना माहिती नाही, हे दुर्दैव आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
अडीच वर्षात तुम्ही काय केलं?
तरुणांचे डोके भडकवायचे हे राजकारण नसते. तुम्हाला अडीच वर्षे दिले, त्यात तुम्ही काय केले हे सांगा. तुम्ही स्वत:चे आमदार सांभाळू शकला नसाल मग राज्य कसं सांभाळलं हे सांगण्याची गरज नाही असंही त्यांनी म्हटलं. त्याचसोबत हा प्रकल्प गुजरातला गेला त्याचे पाप महाविकास आघाडी सरकार आणि त्याचे सुप्रीमो त्यांचे वडील यांचे आहे. आदित्य ठाकरेंनी त्यांच्या वडिलांनाच विचारावा हा प्रकल्प कसा गेला, कुणामुळे गेला. याची चौकशी लावावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना करणार आहेत, असेही सत्तार यांनी म्हटले.