रनिंग ट्रॅकवर वाहने नेल्याप्रकरणी प्रशासनाची दिलगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:09 AM2021-06-28T04:09:15+5:302021-06-28T04:09:15+5:30
पुणे : बालेवाडी-म्हाळुंगे येथील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलातील समारंभादरम्यान आंतरराष्ट्रीय सिंथेटिक रनिंग ट्रॅकवर शनिवारी वाहने नेल्याप्रकरणी क्रीडा व युवक ...
पुणे : बालेवाडी-म्हाळुंगे येथील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलातील समारंभादरम्यान आंतरराष्ट्रीय सिंथेटिक रनिंग ट्रॅकवर शनिवारी वाहने नेल्याप्रकरणी क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि क्रीडा संकुल प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.
नियोजित क्रीडा विद्यापीठासाठी या संकुलाची पाहणी आणि आढावा बैठक घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार आणि अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांचा लवाजमा उपस्थित झाला होता. या मंडळींच्या वाहनांनी सर्व नियमांचे उल्लंघन करून रनिंग ट्रॅकवर वाहने नेली. याप्रकरणी धावपटू, क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. रनिंग ट्रॅकवर कसे वावरावे याचे मूलभूत ज्ञान नसलेली ही मंडळी ‘क्रीडा विद्यापीठ‘ काय काढणार, असा संताप धावपटूंकडून व्यक्त होत आहे. ‘लोकम”‘ने रविवारच्या अंकात ‘रनिंग ट्रॅकवर व्हीआयपींच्या गाड्या, धावपटूंची नाराजी’ असे वृत्त प्रसिद्ध केले होते.
याप्रकरणी राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी दखल घेत यापुढे रनिंग ट्रॅकवर वाहनांना प्रवेश न देण्याचे आदेश दिले. शरद पवार यांच्या पायाला त्रास होत असल्याने एकाच वाहनाला शेजारच्या सिमेंट काँक्रीटवरून जाण्यास परवानगी दिली होती. मात्र, त्याच वेळी काही वाहने थेट रनिंग ट्रॅकवर आल्याची घटना घडली. याप्रकरणी मी दिलगिरी व्यक्त करतो. यापुढे असा प्रकार घडणार नाही, असे राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सांगितले. बालेवाडी-म्हाळुंगे येथे संकुल पाहणीदरम्यान अॅथलेटिक्स ट्रॅकशेजारी असलेल्या सिमेंट काँक्रीटवरून जाण्यास एका वाहनास परवानगी देण्यात आली होती. परंतु काही गाड्या अचानक ट्रॅकवर गेल्याने याबाबत दिलगिरी व्यक्त करत आहोत, असा लेखी खुलासा क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांनी केला आहे.
कोट -----
बालेवाडी क्रीडा संकुल येथील रनिंग ट्रॅकवर कालच्या कार्यक्रमावेळी गाड्या लावण्यात आल्या. ही आमच्याकडून झालेली चूक आहे. ही चूक भविष्यात होणार नाही यासाठी आम्ही काळजी घेत आहोत. आम्ही त्या ठिकाणी व्हीआयपी गाड्यांना परवानगी दिली होती. परंतु, त्या गाड्या नेमक्या कुठे लावायच्या? कशा पद्धतीने लावायच्या? याबाबतीत सूचना देण्यास कमी पडलो. त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलिसांना याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु, गाड्यांचा ताफा आतमध्ये आल्यानंतर गोंधळ उडाला. ही आमच्या नियोजनातील मोठी चूक आहे. परंतु भविष्यात ही चूक होणार नाही याबाबत सर्व अधिकारी व संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.
- ओमप्रकाश बकोरिया, क्रीडा आयुक्त