मतदारांना आधार जोडणी करण्याचे प्रशासनाचे आवाहन; ...असा करा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 11:54 AM2022-08-10T11:54:30+5:302022-08-10T11:56:56+5:30
निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार मतदार यादीला आधार जोडणे ऐच्छिक
पुणे : केेंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार मतदार यादीला आधार जोडणे ऐच्छिक असून, त्याबाबत सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मतदारांनी आधार जोडणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. यासाठी अर्ज क्रमांक ६ ब भरून ही माहिती देता येणार आहे.
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची ऐच्छिकपणे आधारची माहिती मतदार यादीतील तपशिलाशी जोडण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देशमुख यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज क्रमांक ६ ब ची नोंदणी केली. या कार्यशाळेला निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, तहसीलदार रूपाली रेडेकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखाप्रमुख उपस्थित होते. अधिकारी तसेच कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांचा अर्ज क्र. ६ ब भरावा, असे आवाहन देशमुख यांनी केले.
...असा करा अर्ज
सावंत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना ६ ब चा अर्ज ऑनलाइन भरण्याबाबतची माहिती दिली. जिल्ह्यातील सर्व मतदारसंघाची कार्यालये, उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांच्या कार्यालयामध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, प्रत्येक कार्यालयामध्ये यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. मतदार यादीतील सध्याच्या मतदारांना त्यांचा आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. ६ ब भारत निवडणूक आयोगाच्या www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा ‘व्होटर हेल्पलाइन’ ॲप आपल्या डाऊनलोड करून भरता येईल.