जेजुरीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला; प्रशासन लागले कामाला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 03:35 PM2020-05-09T15:35:48+5:302020-05-09T15:46:23+5:30
तालुक्यात एकच खळबळ, संक्रमणाची साखळी रोखण्यासाठी योग्य त्या उपाय योजना राबविल्या जाणार
जेजुरी: तीर्थक्षेत्र जेजुरीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीमधील एका डायलिसिस सेंटरमध्ये टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या २६ वर्षीय कर्मचाऱ्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. रुग्णाला आज उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे. सेंटरमधील इतर कर्मचाऱ्यांसोबतच संपर्कातील सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्या सर्वांची तपासणी केली जाणार आहे.
दरम्यान, भक्त निवास इमारतीवर औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आली आहे. मार्तंड देव संस्थान ने दोन हजारावर बेघर, गरजू साठी गेले महिनाभर येथूनच अन्नदान सेवा सुरू केली होती. जेजुरी व परिसरातील अनेक कुटुंबाना किराणा किट वाटप केले आहे. साधारणपणे दीड कोटी रुपये खर्चून देव संस्थान ने सर्वसामान्यांना मदत केली आहे. दररोज शेकडो लोकांचा संपर्क आला असल्याने शहरात प्रचंड भीतीचे बातावरण निर्माण झाले आहे.
तीर्थक्षेत्र जेजुरीत कोरोना संक्रमित रुग्ण आढळल्याने पुरंदरचा प्रशासन विभाग खडबडून जागा झाला असून या रोगाचा प्रसार रोखणे व संक्रमण होऊ नये म्हणून आता वेगवेगळ्या उपाययोजना सुरू करण्यात येत आहेत.
पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागीय अधिकारी म्हणून पुरंदर चे प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नेमण्यात आले आहे. या पथकात जेजुरीच्या मुख्याधिकारी, जेजुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, जेजुरी ग्रामीण रुग्णालय अधीक्षक, तालुका गट विकास अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे. या पथकाच्या माध्यमातून जेजुरी परिसरातील संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची यादी, त्यांचा अजून कोणाशी संपर्क आला आहे का याची माहिती गोळा केली जाणार आहे. संक्रमणाची साखळी रोखण्यासाठी योग्य त्या उपाय योजना राबविल्या जाणार आहेत.
यात जेजुरी व परिसराचे कॅटेन्मेंट झोन व बफर झोन तयार करण्यात आले आहेत. सर्वप्रथम जेजुरीतील सर्व दैनंदिन व्यवहार पुढील तीन दिवसासाठी बंद ठेवण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहेत. शहराची संपूर्ण नाकाबंदी करण्यात आली आहे. वाहनांची तपासणी करणे, वाहन बंदी करणे, संचारबंदी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जे जे उपाय योजना कराव्या लागतील त्या उपाय योजना राबवण्याचे अधिकार या समितीला देण्यात आलेले आहेत.
जेजुरी नगरपालिका हद्दीतील संपूर्ण जेजुरी शहर, खोमणे आळी, जेजुरी ग्रामीण, रेल्वे स्टेशन, कडेपठार परिसर ज्ञानोबा नगर, खोमणे मळा आदी परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर जेजुरी शहरालगतच्या गावे यात जगताप वस्ती, कोथळे, धालेवाडी, रानमळा, जेजुरी औद्योगिक वसाहत, कोळविहिरे, मावडी, नाझरे जलाशय परिसर, नाझरे क. प, नाझरे सुपे, खैरे वाडी निळुंज, वाळुंज, हा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरातील रहिवाशांना याबाबत मार्गदर्शन करावे, त्याच बरोबर आशा, आरोग्य केंद्र कर्मचारी यांच्या मार्फत आरोग्य तपासणी करावी, बाधित अथवा कोरोना सदृष्य रुग्णांची माहिती नियंत्रण कक्षाला कळवणे, रोगाविषयी प्रचार, घ्यावयाची काळजी बाबत माहिती देणे आदी उपाययोजना राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.संपूर्ण प्रशासन आता कामाला लागले असून जेजुरी शहराची नाकेबंदी करण्यात आली आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले असून कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची यादी बनवली जात आहे.