शिक्षण विभागाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:10 AM2021-07-15T04:10:22+5:302021-07-15T04:10:22+5:30
पुणे : शिक्षण विभागातील राज्य दर्जाच्या अधिकाऱ्यांसह पुणे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील अनेक अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. ...
पुणे : शिक्षण विभागातील राज्य दर्जाच्या अधिकाऱ्यांसह पुणे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील अनेक अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे या पदांचा कार्यभार इतरांकडून प्रभारी स्वरुपात देण्यात आला आहे. पूर्णवेळ अधिकारी नसल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कामांचा खोळंबा होत असून शाळांविरोधातील तक्रार कोणाकडे करावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्याच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक पदासह राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालक पदाचा कार्यभार एकाच अधिकाऱ्याकडे देण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे. तसेच राज्य मंडळाच्या अध्यक्ष पदाचे पदही रिक्त आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदही रिक्त असून जिल्ह्यातील ४ ते ५ गटशिक्षण अधिकाऱ्यांची व एका उपशिक्षण अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचे कामकाज मर्यादित मनुष्यबळाकडून करून घेतले जात आहे.
शिक्षण अधिकारीच नाही त्यामुळे शाळांविरोधातील तक्रार करण्यासाठी कोणाकडे जावे, असा प्रश्न काही वेळा पालकांना पडतो. तसेच शाळा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कामे अडकून पडत असल्याने शिक्षक संघटनांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
----------------------
एकाच अधिकाऱ्याकडे दोन ते तीन पदांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला एका कार्यालयात पूर्णवेळ थांबता येत नाही. परिणामी शिक्षकांना ताटकळत थांबावे लागते. बाहेरगावाहून आलेल्या शिक्षकांची गैरसोय होते. शिक्षकांचे पगार, मान्यता आदी प्रश्न लवकर मार्गी लागत नाहीत.
- नारायण शिंदे, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघटना
-----------------
शिक्षण विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे पालकांचे शाळांसंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांची भेट घेता येत नाही. शासनाकडून काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी नीटपणे होत नाही. त्यामुळे शासनाने या रिक्त जागा भरणे गरजेचे आहे. - संजय जोशी, पालक
------------------
शिक्षण विभागाच्या कार्यालयात शिक्षण अधिकारी नसल्यामुळे आरटीई प्रवेशासह ,शाळांविरोधातील कारवाई होत नाही.शासन आदेशाची अंमलबजावणीसाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे.परंतु,तब्बल ५० टक्के जागा रिक्त असल्याने अनेक अडचणी येत आहेत. - मुकुंद किर्दत, आप पालक युनियन
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण कार्यालयातील पदांची माहिती
पद एकूण पदे रिक्त पदे
शिक्षणाधिकारी १ १
गणशिक्षण अधिकारी १३ ४
उपशिक्षण अधिकारी ३ १
---------------------------------------
प्राथमिक शाळांची संख्या : ३ हजार ६५२
एकूण विद्यार्थी संख्या : २ लाख ३२ हजार
शिक्षकांची संख्या : ११ हजार ५००
------------------------------------
माध्यमिक शाळांची संख्या : १ हजार ९३२
एकूण विद्यार्थी संख्या : ९ लाख २३ हजार ६००
शिक्षकांची संख्या : ३०, ०५८