कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन हडबडून जागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:09 AM2021-03-19T04:09:59+5:302021-03-19T04:09:59+5:30
राजगुरुनगर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात खेड तालुक्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भाव आणि उपाययोजनेबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठक घेऊन आढावा ...
राजगुरुनगर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात खेड तालुक्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भाव आणि उपाययोजनेबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठक घेऊन आढावा घेतला.यावेळी प्रांत विक्रांत चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंबाते, तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी अजय जोशी,मुख्याधिकारी प्रकाश पाटील, नानासाहेब कामठे,अंकुश जाधव, राजगुरुनगरचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव, चाकणचे पोलीस निरीक्षक अशोक रजपूत, आदिसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. खेड तालुक्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जारी केलेल्या संभाव्य उपाययोजना अंमलात आणण्यासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणानी कडक अंमलबजावणी करण्यास कोणतीही हयगय न करण्याची सूचना आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी देऊन प्रशासनानाचा कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा मोहिते पाटील यांनी दिला. तसेच नागरिकांनी सुरक्षेसाठी मागील लाॅकडाऊन काळात ज्या प्रमाणे सामाजिक संस्था कार्यकर्तेनी स्थानिक पातळीवर नियोजन केले त्याप्रमाणे प्रशासनाबरोबर आता सामाजिक जाणिवेतून आपल्या कुटुंबाची,आपल्या गावाची सर्वांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन आमदार मोहिते पाटील यांनी केले आहे.
खेड तालुक्यात चाकण औद्योगिक पट्यातील अनेक गावे कोरोनाच्या विळख्यात अडकताना दिसत आहे.शासन निर्देशानुसार लग्नसमारंभ, धार्मिक विधी, अंत्यविधी आदिसाठी देण्यात आलेल्या लोकसंख्येच्या मर्यादांचे उल्लंघन होत असेल. संबंधितांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर तलाठी, ग्रामसेवक,पोलीस पाटील यांना सर्तकेत राहून कारवाईचे आदेश देण्यात आले आहे.शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रासह चाकण,आळंदी आणि राजगुरुनगर येथील ग्रामीण रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येत आहे.मात्र सध्या ज्येष्ठ नागरिकांची लस घेण्यासाठी गर्दी वाढत आहे. ॲपमध्ये ऑनलाईन नोंदणी करताना अडथळे येत आहे.त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येऊन ज्येष्ठ नागरिकांना तिष्ठत थाबांवे लागत आहे. याबाबत तक्रारी येत आहेत. यापुढे ज्येष्ठ नागरिकांनी चौकशी करता थेट लसीकरणाला न येता अगोदर आपल्या ग्रामपंचायतीत ऑनलाईन लसीकरण नोंदणी करावी आणि मोबाईलवर आलेल्या मॅसेजनुसारच संबंधित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करुन घेण्याचे आवाहन प्रांत विक्रांत चव्हाण तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी अजय जोशी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी केले आहे.