सोशल डिस्टन्सिंगसाठी प्रशासनाची प्रयत्नांची पराकाष्ठा अन् दुसरीकडे पाण्याच्या टँकरभोवती जमलेल्या गर्दीकडे दुर्लक्ष  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 08:10 PM2020-04-23T20:10:30+5:302020-04-23T21:40:19+5:30

दिवसेंदिवस टँकरभोवती होणारी ही गर्दी मात्र कोरोनाचा प्रसार करण्यास कारणीभूत ठरू नये अशी भीती

Administration ignored the crowd who around the water tanker in uruli kanchan | सोशल डिस्टन्सिंगसाठी प्रशासनाची प्रयत्नांची पराकाष्ठा अन् दुसरीकडे पाण्याच्या टँकरभोवती जमलेल्या गर्दीकडे दुर्लक्ष  

सोशल डिस्टन्सिंगसाठी प्रशासनाची प्रयत्नांची पराकाष्ठा अन् दुसरीकडे पाण्याच्या टँकरभोवती जमलेल्या गर्दीकडे दुर्लक्ष  

Next
ठळक मुद्दे उरूळी देवाची व परिसरात महापालिकेकडून दररोज ७५ ते १०० टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा

पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिका प्रशासन एकीकडे प्रयत्नांची पराकाष्टा करीत असतानाच, दुसरीकडे पिण्याच्या पाण्याच्या टँकरभोवती होणाऱ्या गर्दीकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे. उरूळी देवाची येथे दररोज टँकरभोवती मोठी गर्दी होत असतानाच, उपलब्ध पाणीपुरवठा यंत्रणा सुरू करण्याऐवजी प्रशासनाकडून मात्र या बाबीकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच दिवसेंदिवस टँकरभोवती होणारी ही गर्दी मात्र कोरोनाचा प्रसार करण्यास कारणीभूत ठरू नये अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. 
    उरूळी देवाची व परिसरात पुणे महापालिकेकडून दररोज ७५ ते १०० टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. येथे वेगवेगळ्या भागात हे टँकर विविध वेळी जातात. त्यावेळी पाणी मिळविण्यासाठी टँकरच्या टाकीचे झाकण उघडून पाईप टाकण्यासाठी व या टँकरच्या नळाभोवती हंडे लावण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. सुमारे २५ हजार लोकसंख्या असलेल्या या भागासाठी, पुणे महापालिकेने मंतरवाडी आणि उरुळी देवाची या गावाला बंद पाइपलाइनच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचे काम पूर्णही केले आहे. पालिकेकडून पुरविण्यात येणारे पिण्याचे पाणी मंतरवाडीपर्यंत जाते. पण पुढे उरूळी देवाची व परिसरात मात्र पाईपलाईनव्दारे अद्यापही जात नाही. यामुळे येथे टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याचे काम कित्येक महिने चालू आहे. 
    सद्यस्थितीला कोरोनाचा प्रसार वाढत असतानाच शहरात शेकडोच्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत आहेत. हा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना बाहेर पडू नये म्हणून आवाहन केले आहे. परंतू, या भागात पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी नागरिकांना टँकरशिवाय पर्याय नाही. येथे नित्याने गर्दी होत असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मात्र या गर्दीकडे गांभीर्याने पाहिले गेलेले नाही. त्यामुळे ही गर्दी कोरोना आजाराला निमंत्रण देणारीच ठरत आहे़. कोरोनाचा प्रसार या भागात सुदैवाने झालेला नाही़. परंतू नित्याने येणारे टँकर व होणारी गर्दी टाळण्यासाठी आता तरी पालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेली पाणीपुरवठा यंत्रणा येथे तात्काळ कार्यान्वित करावी अशी मागणी भारिप चे शहराध्यक्ष व उरुळीचे माजी उपसरपंच अतुल बहुले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. 
    याबाबत बहुले यांनी सांगितले की, मंतरवाडी ते ऊरळीपर्यंत पाणी पुरवठा करण्यासाठी तीन दशलक्ष लिटर ची पाण्याची टाकी बऱ्याच दिवसांपासून कचरा डेपो परिसरात उभारून तयार आहे. कचरा डेपो परिसरात नलीकेद्वारे पाणी पुरवठा केला जातो, त्या प्रमाणे ऊरूळी देवाची गावास हा पाणीपुरवठा करावा़ व सद्याची परिस्थिती करोनामुळे गंभीर असल्याने, कोरोनाचा धोका लक्षात घेऊन येथील पाण्यासाठी होणारी गर्दी टाळावी. अन्यथा कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही सनदशीर आंदोलन करू असा इशाराही बहुले यांनी दिला आहे. 
------------------
पाईप लाईन टाकण्यास संरक्षण खात्याची एनओसी नसल्याने काम थांबले : महापौर मुरलीधर मोहोळ
  उरळी देवाची येथील पाणी पुरवठा करण्यासाठी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे ३३ दललक्ष लिटर पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम चालू आहे. सद्यस्थितीला केवळ संरक्षण खात्याच्या हद्दीतील ४०० मिटर अंतराची पाईपलाईन टाकण्यासाठी एनओसी (ना हरकत परवाना) न मिळाल्याने, हे बंद पाईपलाईनव्दारे पाणीपुरवठा करण्याचे काम थांबले आहे़, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लोकमतशी बोलताना दिली. दरम्यान या भागात पिण्याच्या पाण्याचा मुबलक पुरवठा पालिकेकडून करण्यात येत असून, येथील नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिंगचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले. उरूळी देवाची येथे पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून दररोज १६० पिण्याच्या पाण्याचे टँकर पाठविले जात आहेत. 

Web Title: Administration ignored the crowd who around the water tanker in uruli kanchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.