कचरा प्रश्नावर प्रशासन हतबल

By admin | Published: April 26, 2017 04:22 AM2017-04-26T04:22:47+5:302017-04-26T04:22:47+5:30

उरुळी ग्रामस्थांचा तेथील कचरा डेपोला असलेला विरोध कायम असल्यामुळे शहरातील कचराकोंडी वाढत चालली आहे.

Administration on the issue of garbage was notable | कचरा प्रश्नावर प्रशासन हतबल

कचरा प्रश्नावर प्रशासन हतबल

Next

पुणे : उरुळी ग्रामस्थांचा तेथील कचरा डेपोला असलेला विरोध कायम असल्यामुळे शहरातील कचराकोंडी वाढत चालली आहे. कचरा जिरवायचा कसा, या प्रश्नाने प्रशासन चिंतीत झाले असून आयुक्त परगावी असल्याने या विषयावर दुसऱ्या फळीतील अधिकाऱ्यांना निर्णय घेणे अवघड झाले आहे. दरम्यान, महापौर मुक्ता टिळक यांनी मंगळवारी कचरा प्रक्रिया प्रकल्प चालवणाऱ्या चालकांची बैठक घेऊन त्यांना क्षमता वाढवण्याची सूचना केली.
कचऱ्याचा विषय गंभीर होत चालला असून आता यात वरिष्ठ प्रशासकीयस्तरावरून हस्तक्षेप होण्याची गरज आहे. मात्र आयुक्त कुणाल कुमार काही दिवसांच्या रजेवर गेले आहेत. प्रभारी आयुक्त म्हणून अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्याकडे कार्यभार आहे. सोमवारी ते स्मार्ट सिटी संबंधातील एका बैठकीसाठी परगावी गेले होते. मंगळवारी ते पुण्यात होते, पण दिवसभर सर्वसाधारण सभेच्या कामकाजात होते. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप यांनी मंगळवारी उरुळी ग्रामस्थांबरोबर बैठक घेतली, पण त्यातून काहीच मार्ग निघू शकला नाही. तुमच्या कचऱ्यामुळे आता आम्हाला आमचे आरोग्य बिघडवून घ्यायचे नाही, तुमची मदतही नको व कचराही नको, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. त्यामुळे आता हळुहळू शहरात कचरा साठू लागला आहे.
महापौर टिळक यांनी मंगळवारी घेतलेल्या बैठकीत कचरा प्रकल्पांच्या संचालकांना कचरा जिरवण्याच्या त्यांच्या क्षमतेत वाढ करण्याची सूचना केली. महापालिकेचे हंजर हा सुमारे १ हजार टन क्षमतेचा प्रकल्प महापालिकेच्याविरोधात लवादात गेला आहे. त्यामुळे त्याचे काम बंद आहे. त्याबाबत काय करता येईल तसेच आहे त्या मोठ्या प्रकल्पाची क्षमता कशी वाढवता येईल, याचा अभ्यास करण्यास महापौरांनी प्रशासनाला सांगितले. थोडी क्षमता वाढवली तरी काही टन कचऱ्याचा निकाल लागेल, असे त्यांनी सांगितले. शहराचे आरोग्य धोक्यात येण्याआधीच या समस्येवर उपाय काढावा, असे त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले. (प्रतिनिधी)

Web Title: Administration on the issue of garbage was notable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.