प्रशासन-काश्मिरी जनतेत संवादाचा अभाव- डॉ. शाह फैजल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 03:57 AM2019-02-01T03:57:37+5:302019-02-01T03:57:53+5:30
हिंसक वातावरण थांबविण्यासाठी दोन्ही शासन, प्रशासन व काश्मिरी जनतेमध्ये संवादाची गरज आहे, असे मत माजी आयएएस अधिकारी डॉ. शाह फैजल यांनी वार्तालापामध्ये व्यक्त केले.
पुणे : मागील काही वर्षांमध्ये काश्मीरमधील परिस्थिती खूप बिघडली आहे. त्यामुळे येथील तरुण द्वेषापोटी हातात शस्त्रे घेत आहेत. तसेच जेव्हा जेव्हा पाकिस्तान आणि भारतात संवादाची भूमिका घेतली त्यावेळी काश्मीरमधील वातावरण शांत झाले होते. त्यामुळे हे हिंसक वातावरण थांबविण्यासाठी दोन्ही शासन, प्रशासन व काश्मिरी जनतेमध्ये संवादाची गरज आहे, असे मत माजी आयएएस अधिकारी डॉ. शाह फैजल यांनी वार्तालापामध्ये व्यक्त केले.
डॉ. फैजल म्हणाले, सध्याचे सरकार हे काश्मीर प्रश्नाबाबत अपयशी ठरले आहे, कारण तेथे दररोज रक्त वाहत आहे. त्यामुळे काश्मीरच्या प्रश्नाचे राजकारण करू नये, कारण आजवर तेथे पेटणाऱ्या आगीत तेल ओतण्याचे काम करण्यात येत असून, तसे न करता त्यात पाणी ओतून आग शांत करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. कारण काश्मीरवासीयांना नवी आशा देण्याची गरज आहे. तिथे रोज लोक मरत आहेत. जम्मू-काश्मीर मधील राजकीय परिस्थिती, येथील राजकारण तरुणाईला धरून नाही. मतदानास पात्र असून येथील तरुण निवडणुकीत मतदान करत नाहीत. म्हणून मला तरुणांना सोबत घेऊन योग्य दिशेने राजकारण करायचे आहे. काश्मिरी पंडित माझ्याशी सहमत आहेत.
मतदान तरी का करावे...
काश्मीर येथील वातावरण अत्यंत चिघळत चालले आहे. कारण तरुणांचे वैधानिक अधिकार हिसकावून घेतले जात आहेत, अशी भावना तरुणांच्या मनात तयार झाली आहे. याचाच परिणाम त्यांचा आता राजकारण्यांवर अजिबात विश्वास राहिलेला नाही. आपला अधिकारच नाही तर आपण मतदान तरी का करावे, असा प्रश्न ते उपस्थित करत आहेत, असे त्यांनी सांगितले.
फैजल म्हणाले, या हिंसक वातावरणाला दोन्ही देशांमधील संवादाची भूमिका हा एकच पर्याय उरला आहे. काश्मिरी पंडितांशिवाय, जम्मू-काश्मिरी पंडितांशिवाय जम्मू-काश्मीरची संस्कृती अपूर्ण आहे. तेथील मुलांना मूळ संस्कृतीबाबत काहीच माहिती नाही. त्यामुळेच काश्मीरची मूळ ओळख कायम ठेवायची असेल तर शांतता प्रस्थापित करुन काश्मिरला बोलाविले पाहिजे. धर्म, प्रदेश, प्रांत यापलीकडे जाऊन काश्मिरचा प्रश्न सोडविला पाहिजे.