महापालिका अधिकाऱ्यांना मारहाणीनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर; आजच्या कारवाईत विभाग अन् पोलिसांचा मोठा ताफा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 02:17 PM2022-03-30T14:17:37+5:302022-03-30T14:33:09+5:30
धानोरी रस्त्यावर यासाठी अतिक्रमण विभागाचा मोठा ताफा तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला रस्त्याच्या दुतर्फा असणार्या अतिक्रमणावर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.
येरवडा : धानोरी येथे मंगळवारी अतिक्रमण कारवाईदरम्यान अधिकारी व कर्मचारी यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. बुधवारी सकाळी दहा वाजल्यापासून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. धानोरी रस्त्यावर यासाठी अतिक्रमण विभागाचा मोठा ताफा तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला रस्त्याच्या दुतर्फा असणार्या अतिक्रमणावर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.
या मोठ्या कारवाईसाठी अतिक्रमण विभागाच्या संपूर्ण स्टाफ सह आकाशचिन्ह परवाना व बांधकाम विभाग तसेच येरवडा क्षेत्रीय कार्यालय कडील सर्व अधिकारी व कर्मचारी कारवाईसाठी नियुक्त करण्यात आलेले आहेत. काल कारवाईदरम्यान अतिक्रमण निरीक्षक व जेसीबी चालक यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर महापालिका प्रशासनाने अधिक कठोर भूमिका घेत ही कारवाई सुरू केली आहे. कारवाईसाठी सुमारे पंचवीस जेसीबी, दीडशे अधिकारी व कर्मचारी, 100 पोलीस यांच्यासह दंगल पथक घटनास्थळी कारवाईसाठी तैनात करण्यात आलेले आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.
संपूर्ण शहरातील अतिक्रमणे काढणार
''निरीक्षक व चालक यांना कारवाईदरम्यान झालेल्या हल्ल्याचा काळया फिती लावून निषेध नोंदवत बुधवारी सकाळी अतिक्रमण कारवाईला सुरुवात करण्यात आली. कोणत्याही विरोधाला न जुमानता महापालिका प्रशासन संपूर्ण शहरातील अतिक्रमणे काढणार असल्याचे यावेळी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.''