पारदर्शी मतदानासाठी प्रशासन सज्ज! पुण्यातील ४ मतदारसंघासाठी ८२ लाख मतदार हक्क बजावणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
By श्रीकिशन काळे | Published: March 17, 2024 03:51 PM2024-03-17T15:51:25+5:302024-03-17T15:52:27+5:30
ज्या ठिकाणी अतिसंवेदनशील केंद्रे आहेत, तिथे मुबलक बंदोबस्त असेल आणि केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील
पुणे : पुणे जिल्ह्यात पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर हे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. राज्यात एकमेव हा जिल्हा आहे, जिथे चार लोकसभा मतदारसंघ असून, एकूण मतदारांची संख्या ८२ लाख २४ हजार ४२३ आहे. त्यासाठी ८ हजार ३८२ मतदान केंद्रे असतील. तर ४४ ईव्हीएम मशीन लागणार आहेत, तसेच निवडणूकीसाठी आवश्यक मनुष्यबळ देखील सज्ज करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पारदर्शी मतदानासाठी आम्ही कडक बंदोबस्त देखील करू, असेही आश्वासन त्यांनी दिले.
या वेळी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे, ग्रामीण पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी, पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे उपस्थित होते.
डॉ. दिवसे म्हणाले, शहरात आचारसंहिता लागू केली आहे. सर्व ठिकाणचे फलक काढण्याचे आदेश व संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत. तीन दिवसांमध्ये ते काढले नाही तर आम्ही कारवाई करू. फलक काढण्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करू आणि त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करू. ही निवडणूक संपूर्णपणे पारदर्शक होण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आमचे प्रशासन काटेकोरपणे सर्व नियोजन करत आहे. पोलीसांनी देखील तयारी केली आहे.’’
दिव्यांग, ज्येष्ठांसाठी खास सोय
जे मतदार दिव्यांग आहेत आणि ८५ वयापेक्षा अधिक आहेत, त्यांच्यासाठी आम्ही घरपोच मतदान घेण्याची सोय करणार आहोत. तसेच यांच्यासाठी प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन मतदान करायचे असेल तर त्यांच्यासाठी व्हीलचेअरची सोय केलेली आहे. तसेच ‘सक्षम ॲप’ देखील उपलब्ध करून दिले आहे.
अतिसंवेदनशील केंद्रे
पुणे जिल्ह्यात एकूण ३९ अतिसंवेदनशील मतदान केंद्रे आहेत. त्यातील भोरला ३२, खेड-आळंदी ५ आणि आंबेगाव येथे २ आहेत.
सीसीटीव्हीची नजर
ज्या ठिकाणी अतिसंवेदनशील केंद्रे आहेत, तिथे मुबलक बंदोबस्त असेल आणि केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. इंटरनेट सुविधा चांगली मिळण्यासाठी टॉवर उभारण्यात येतील. जेणेकरून तिथले मतदान टक्केवारी मिळेल.
स्ट्रॉग रूम व मतमोजणी कुठे?
पुणे, बारामती : एफसीआय गोदाम, कोरेगाव पार्क
मावळ : बालेवाडी स्टेडियम
शिरूर : स्टेट वेअरहाऊस, रांजणगाव, शिरूर
कोणत्या मतदारसंघात किती ईव्हीएम
पुणे : २६२३
बारामती : ३२७१
मावळ : १७४१
शिरूर : ३२६२
एकूण : १०,८९७
पुणे जिल्ह्यावर दृष्टीक्षेप
एकूण मतदार : ८२ लाख
मतदान केंद्रे : ८३८२
निवडणूक कर्मचारी : ७८ हजार
ईव्हीएम मशीन : ४४ हजार
एकूण वाहने : ३६७५
पुणे जिल्ह्यातील मतदार
पुरूष मतदार : ४२ लाख
महिला मतदार : ३९ लाख
पहिल्यांदा नवमतदार : ३५ हजार २३२
दिव्यांग मतदार : ८५ हजार
सरकारी कर्मचारी : ५७७७