बलिदान स्मरणदिनासाठी प्रशासन सज्ज - सुवेझ हक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 05:05 AM2018-03-10T05:05:33+5:302018-03-10T05:05:33+5:30
‘‘शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती करताना सर्व जाती-धर्म-पंथ, संप्रदायाला बरोबर घेऊन केली असल्याने शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शंभूछत्रपतींचा २९ वा बलिदानस्मरणदिन राज्यातील सर्व जातीधर्मातील लोकांना बरोबर घेत नियोजनपूर्वक शांततेत करण्यासाठी परिसरातील प्रत्येक गावामध्ये स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी शांतता समित्यांच्या बैठका घ्याव्या,’’ असे आवाहन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी केले.
कोरेगाव - ‘‘शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती करताना सर्व जाती-धर्म-पंथ, संप्रदायाला बरोबर घेऊन केली असल्याने शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शंभूछत्रपतींचा २९ वा बलिदानस्मरणदिन राज्यातील सर्व जातीधर्मातील लोकांना बरोबर घेत नियोजनपूर्वक शांततेत करण्यासाठी परिसरातील प्रत्येक गावामध्ये स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी शांतता समित्यांच्या बैठका घ्याव्या,’’ असे आवाहन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी केले.
१ जानेवारीला झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या ३२९ व्या पुण्यतिथीनिमित्त पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे, सुहास गरुड, गटविकास अधिकारी संदीप जठार, पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, सर्जेराव पाटील, नायब तहसीलदार सुनील शेळके, एस. यू. शेख व शासकीय सर्व विभागांचे अधिकारी, परिसरातील गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी मार्गदर्शन करताना सुवेझ हक बोलत होते.
हक म्हणाले, ‘शंभूराजांच्या बलिदान स्मरणदिनाचे योग्य नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन करा. वढू-तुळापूर या दोन्ही ठिकाणी शंभूराजांच्या समाधीवर नतमस्तक होण्यासाठी येणाºया दिंड्या, शंभुभक्त यांच्यासाठी वाहनतळाची व्यवस्था, वढू ते चौफुला व तुळापूर येथील खड्डे तत्काळ दुरुस्त करण्याचे व परिसरात विनाखंड वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणला सूचना देण्यात आल्या आहेत. दोन्हीकडील समाधीस्थळाची साफसफाई व्यवस्थित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तुळापूरच्या शासकीय मानवंदनेसाठी मंत्रालयाची परवानगी आवश्यक असल्याने शासनास प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. लोकांच्या मदतीशिवाय काम करणे शक्य नसल्याने स्थानिक स्वयंसेवकांनी पोलिसांच्या मदतीला यावे. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी भीमा नदीपात्रात लाईफ गार्ड तैनात ठेवण्याचे आदेश गटविकास अधिकाºयांना दिले. या वेळी छत्रपती संभाजीमहाराज पालखी सोहळ्याचे अध्यक्ष संदीप भोंडवे व कार्याध्यक्ष राजेंद्र सातव म्हणाले, पुरंदर ते वढू तुळापूर पालखी सोहळ्यात नारायणपूर ते वाघोली वाहनातून प्रवासात २५० ते ३०० चारचाकी वाहने असल्याने वाहतुकीचा प्रश्न उपस्थित होणार नाही, याची काळजी घ्यावी. शिवसेना जिल्हा उपप्रमुख अनिल काशीद यांनी वढू ते चौफुला रस्ता दुरुस्ती व शिरूर हवेली तालुक्यात पुण्यतिथीदिवशी दारूविक्री बंद ठेवण्याची मागणी केली.
पुतळा संरक्षण समिती तयार करा
देशात पुतळ्याबाबत चुकीच्या पद्धतीने वातावरण निर्माण झाल्याने व पोलीस प्रशासनाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने स्थानिक लोकांची पुतळा संरक्षण समिती तयार करा व स्वयंसेवक व ग्रामसुरक्षा दलातील तरुणांनी आपल्या परिसरातील महापुरुषांच्या पुतळ्यांचे संरक्षण करावे, जेणेकरून समाजात तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन सुवेझ हक यांनी केले.
वढू-कोरेगाव-पेरणेसाठी १ अधिकारी, १५ कर्मचारी
१ जानेवारी दंगलीच्या पार्श्वभूमीवर वढू-कोरेगाव-पेरणे येथील पोलीस चौकीसाठी १ अधिकारी, १५ कर्मचारी नेमण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्यावर तुळापूरसाठीही पोलीस चौकी तयार करण्याचा प्रस्ताव तयार करून मात्र ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी सुवेझ हक यांनी केली.
ड्रोन कॅमेºयात करणार कैद
शंभू छत्रपतींच्या बलिदानस्मरण दिनानिमित्त वढू-तुळापूर परिसरातील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनामार्फत सीसीटीव्ही कॅमेºयांबरोबरच यावर्षी ड्रोन कॅमेºयांचाही वापर करण्यात येणार असल्याने छोट्यात-छोटी गोष्ट ड्रोन कॅमेºयात कैद होणार आहे.