शाळा सुरू करण्यास प्रशासन सज्ज ; पालकांचे सहकार्य गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:09 AM2020-12-27T04:09:13+5:302020-12-27T04:09:13+5:30
पुणे: कोरोनानंतर शाळा सुरू करण्यास पुण्यातील बहुतांश संस्थाचालक सकारात्मक असून त्यादृष्टीने शाळा प्रशासनाकडून आवश्यक तयारी पूर्ण केली जात आहे. ...
पुणे: कोरोनानंतर शाळा सुरू करण्यास पुण्यातील बहुतांश संस्थाचालक सकारात्मक असून त्यादृष्टीने शाळा प्रशासनाकडून आवश्यक तयारी पूर्ण केली जात आहे. बरेच विद्यार्थ्याही शाळेत जाण्यास उत्सूक आहेत. मात्र, पालकांच्या सहकार्याशिवाय शाळा सुरू होऊ शकणार नाहीत. तसेच तब्बल आठ महिने शाळा बंद असल्याने स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याच्या टाक्या सुस्थितीत नाहीत.त्यामुळे आठवड्याभरात शाळा पुन्हा सुस्थितीत सुरू करण्याचे प्रशासनासमोर आव्हान असणार आहे.
राज्यातील शाळा 27 नोव्हेंबर रोजी सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली असली तरी पुणे शहरातील शाळा सुरू झाल्या नव्हत्या. रुग्णांची संख्या पूर्णपणे आटोक्यात न आल्याने पुणे महापालिका प्रशासनाने 3 जानेवारीपर्यंत शाळा सुरू करण्यास परवानगी दिली नव्हती. मात्र,येत्या 4 जानेवारीपासून शहरातील शाळांची घंटा वाजवण्यास प्रशासनाने परवानगी दिली. त्यामुळे शाळा प्रशासननासह मुख्याध्यापक ,शिक्षक तयारीला लागले आहेत. तसेच शाळेने मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली तर मुलांना शाळेत पाठवण्याची आमची तयारी आहे,असे पालक सांगत आहेत.
--------------------------
शाळा सुरू करण्याची आमची तयारी आहे.मात्र, त्यासाठी पालकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिकता तयार करावी.अजूनही कोरोनाबाबतची भिती गेलेली नाही.त्यामुळे 20 ते 25 टक्के विद्यार्थी शाळेत येण्याची शक्यता आहे.या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था व त्यांच्यासाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था उपलब्ध करून देता येईल.विद्यार्थी उपस्थिती वाढल्यानंतर अधिक बारकाईने नियोजन करावे लागेल.
- शरद कुंटे, अध्यक्ष, नियामक मंडळ,डेक्कन एज्युकेशन सोसायटी
-----------------------------------
पालिकेने परवानगी दिल्यानंतर शिक्षण प्रसारक मंडळीच्या शाळा सुरू करण्याबाबत संस्थेने सर्व तयारी केली आहे. पालकांनी सहकार्य केले तर शाळा सुरू होतील. वेळप्रसंगी कामाचे तास दुप्पट करून दिवसातून दोन वेळा भरवल्या जातील. सॅनिटाझर, शारीरिक अंतर ठेवून सर्व नियम पाळून स्वच्छतागृह प्रत्येक तासाला स्वच्छ केले जातील.
-एस.के. जैन,अध्यक्ष, नियामक मंडळ,शिक्षण,प्रसारक मंडळी
-----------------------------