पुणे नाशिक रेल्वे मार्गासाठी प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 07:16 PM2021-05-19T19:16:37+5:302021-05-19T19:16:44+5:30
शासनाने ५० लाख गुंठा भाव दिला तरी जमिनी न देण्याचा शेतकऱ्यांचा इशारा, शेतकरी आंदोलनाच्या तयारीत
राजगुरूनगर: पुणे -नाशिक रेल्वेच्या मार्गिकामुळे होलेवाडी, मांजरेवाडी खरपुडी या परिसरातील शेतकरी भुमिहिन होऊन देशोधोडीला लागणार आहे. शासनाने जमिनीला ५० लाख रुपये गुंठ्याला भाव दिला तरी रेल्वे मार्गिका होऊ देणार नाही. तसेच होणाऱ्या रेल्वे मार्गाची मोजणी होऊ देणार नाही. असा इशारा शेतकऱ्यांनी दिला असून तो आंदोलनाच्या तयारीत उतरला आहे.
पुणे -नाशिक रेल्वे मार्गिकेसाठी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी नोटीसा देऊन शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरवात केली आहे. स्थानिक शेतकऱ्यांची जमीन देण्याबाबत रेल्वे अधिकारी व खेड प्रशासनाची बैठक घेण्यात आली. यावेळी खेडचे प्रांत अधिकारी विक्रांत चव्हाण, रेल्वे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. पुणे - नाशिक रेल्वे मार्ग देशातील पहिला हायस्पीड रेल्वे मार्ग असणार आहे. या मार्गावर ताशी २२० कि.मी. वेगाने रेल्वे धावणार आहे. त्यामुळे या दोन शहरातील अंतर आता केवळ दोन तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. या भागातील शेतकऱ्याचा फायदा होणार असल्याचे रेल्वे अधिकारी यांनी सांगितले.
दरम्यान रेल्वे साठी जाणाऱ्या जमिनीची मोजणी न करताच शेतकऱ्यांना थेट नोटीसा कशासाठी दिल्या, शेतकऱ्यांना अंधारात ठेवून कवडीमोल भावाने शेतजमिनी घेण्याचा प्रशासनाचा डाव आहे. असा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला.
प्रांत विक्रांत चव्हाण यांनी शेतकऱ्यांची भूमिका समजून घेत प्रश्नांना उत्तरे दिली. मात्र शेतकऱ्यांचे समाधान न झाल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्नाचा भडीमार होताच प्रशासनाला बैठक उरकती घ्यावी लागली.
रेल्वे मार्गिकेची मोजणी होऊ देणार नाही. असा आक्रमक पवित्रा घेत या भागातून रेल्वे मार्ग जाऊ देणार नाही. यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली तरी चालेल असे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.