मुठा कालवा पुन्हा खचला, वेळीच लक्ष देण्याची गरज : आमदार मिसाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 04:47 PM2019-06-21T16:47:16+5:302019-06-21T16:51:50+5:30
मागील वर्षी पर्वतीतील जनता वसाहत भागात घडलेल्या कालवा फुटीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार माधुरी मिसाळ यांनी मुठा उजव्या कालव्याची पाहणी केली. यावेळी कालव्याला पडलेली भगदाडे बघून त्यांनी पाटबंधारे खात्याच्या अधिका-यांची चांगलीच शाळा घेतली.
पुणे : मागील वर्षी पर्वतीतील जनता वसाहत भागात घडलेल्या कालवा फुटीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार माधुरी मिसाळ यांनी मुठा उजव्या कालव्याची पाहणी केली. यावेळी कालव्याला पडलेली भगदाडे बघून त्यांनी पाटबंधारे खात्याच्या अधिका-यांची चांगलीच शाळा घेतली. आतापर्यंत झालेल्या कालवा दुरुस्ती कामांचा आढावा घेण्याबरोबरच कालव्याच्या कोणकोणत्या भागात त्वरित दुरुस्ती करणे आवश्यक आहे आणि कालवा फुटीच्या दृष्टीने धोकादायक ठिकाणे कोणती, याबद्दल माहिती घेत अधिका-यांना महत्त्वाच्या सूचना केल्या.
पुण्यातील जनता वसाहत जवळून जाणारा मुठा उजवा कालवा सप्टेंबर २०१८ मध्ये फुटून या भागातील रहिवाशांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर मिसाळ यांनी पाटबांधारे खात्याचे मुख्य कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार व इतर अधिका-यांसमवेत कालव्याची पाहणी केली.
हा कालवा अनेक ठिकाणी खचला असून पुन्हा दुर्घटना टाळण्यासाठी त्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असल्याचे अधिका-यांच्या निदर्शनास आणून द्यायचे होते, असे सांगून मिसाळ म्हणाल्या, ‘‘काही ठिकाणी कालव्याला मोठी भगदाडे पडली आहेत. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर माती वाहून गेली असून संरक्षक भिंतीचे कामही ढासळले आहे. त्यामुळे कालव्याच्या दोन्ही बाजूंना संरक्षक भिंत बांधण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या आहेत. कालव्यात मोठ्या प्रमाणावर घाण टाकलेली दिसून येत आहे. येत्या ४ ते ५ दिवसांत निविदा काढून कालवा दोन्ही बाजूंनी स्वच्छ करू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. कालव्याच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीसाठीचा प्रस्ताव तयार करून अधिवेशन काळात पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सादर केला जाईल आणि त्याचा निधी उपलब्ध होताच कालवा दुरुस्तीचे काम सुरू करून लवकरात लवकर मार्गी लावले जाईल.’’