इनामदार हॉस्पिटलपुढे प्रशासन झुकले
By admin | Published: March 21, 2017 05:33 AM2017-03-21T05:33:28+5:302017-03-21T05:33:28+5:30
वानवडी येथील इनामदार हॉस्पिटलची आरक्षित जागा बदलून देण्याचे आदेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी काढले आहेत.
पुणे : वानवडी येथील इनामदार हॉस्पिटलची आरक्षित जागा बदलून देण्याचे आदेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी काढले आहेत. त्याचवेळी त्यांच्याकडून बांधण्यात आलेल्या पाच बेकायदा मजले पाडण्याबाबत मात्र आयुक्तांनी मौन पाळले आहे. आयुक्तांनी काढलेल्या बेकायदेशीर आदेशाची कागदपत्रे उजेडात आली आहेत. त्यामुळे शहरातील आरक्षित जागेचा गैरवापर व बेकायदा बांधकामाबाबत महापालिका प्रशासन झुकती भूमिका घेत असल्याचा गंभीर आरोप सजग नागरिक मंचच्या वतीने करण्यात आले आहे.
इनामदार हॉस्पिटलच्या आरक्षित जागेच्या बदल्यात दुसरी जागा देण्याचा प्रस्ताव हॉस्पिटलकडून मांडण्यात आला आहे. मात्र ही जागा घेणे नियमानुसार योग्य ठरणार नसल्याचा अभिप्राय आरोग्य विभागाकडून देण्यात आला होता. मात्र आरोग्य विभागाचा अभिप्राय डावलून आयुक्तांनी मनमानी पद्धतीने इनामदार हॉस्पिटलला जागा बदलून देण्याचे आदेश आयुक्तांनी काढले आहेत, असा आरोप सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे यांनी केला आहे. इनामदार हॉस्पिटलच्या बेकायदेशीर बांधकामाचा विषय गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. याप्रकरणी आयुक्तांकडून इनामदार हॉस्पिटलच्या पूर्ण बाजूने निर्णय घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिकेच्या विकास आराखड्यात (डीपी) सर्वेक्षण क्रमांक १५ मध्ये रुग्णालयासाठी आरक्षित असलेल्या जागेवर कोहिनूर सहकारी संस्था आणि क्रिसेंट इंडिया मेडिकल एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने ‘इनामदार हॉस्पिटल’ची उभारणी करण्यात आली होती.
महापालिकेने हॉस्पिटलच्या ७ मजल्यांना मान्यता दिली असतानाही १२ मजले उभारण्यात आले होते. हे सर्व मजले विनापरवाना असल्याचे त्यानंतर पुढे आले होते. दरम्यान, ट्रस्टने महापालिकेसमवेत केलेल्या करारानुसार २ मजले महापालिकेच्या ताब्यातही दिले नसल्याचे स्पष्ट झाले होते. ही बाब उघडकीस आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याबाबत ट्रस्टला नोटीसही बजाविण्यात आली होती. यादरम्यान त्याविरोधात हॉस्पिटल प्रशासनाकडून नगरविकास विभागाकडून स्थगिती आणली होती. मात्र त्यानंतर ही स्थगिती उठविण्यात आली आहे.