प्रशासन ‘बळी’ची वाट पाहते का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 02:07 AM2018-08-28T02:07:35+5:302018-08-28T02:08:13+5:30
खड्ड्यांमुळे हैराण झालेल्या पुणेकरांची भावना : पावसामुळे शहरातील रस्त्यांची झाली चाळण
पुणे : गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे पुणेकरांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. परंतु, हे प्रचंड पडलेले खड्डे बुजविण्यासाठी महापालिका प्रशासन ‘बळी’ जाण्याची वाट पाहते का, असा सवाल खड्ड्यांमुळे हैराण झालेल्या पुणेकरांकडून विचारला जात आहे.
शहरामध्ये झालेल्या पहिल्याच पावसानंतर बहुतेक सर्व रस्त्यांना प्रचंड खड्डे पडले होते. याबाबत प्रशासनावर जोरदार टीका झाल्यानंतर घाई-घाईने काही प्रमाणात शहरातील खड्डे बुजविण्यात आले. परंतु, एक महिन्याच्या विश्रांतीनंतर शहरात पुन्हा पावसाने जोर धरला.
गेल्या १५ ते २० दिवसांपासून शहरात संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे महापालिकेने घाई-घाईने बुजवलेले खड्ड्यांमधील डबर पावसाने निघून गेले असून, पुन्हा एकदा रस्त्यांची प्रचंड चाळण झाली आहे. शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर ड्रेनेजची झाकणे तुटल्याने धोकादायक झालेत, सिमेंट रस्त्यांवरील स्पीड ब्रेकरवरच खड्डे पडलेत, भुयारी मार्ग, सर्व्हिस रस्ते, पेठामधील लहान रस्ते सर्वच ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे सध्या शहरात सर्वत्र खड्डे पडलेल्या रस्त्यांवरून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याकडे ना लोकप्रतिनिधी लक्ष देते ना प्रशासन. शहरातील खड्डे वेळीच बुजवले नाहीत, तर अपघात होऊन काही बळी जाण्याची शक्यात नाकारता येत नाही.