प्रशासन करणार सभेची ठिकाणे निश्चित
By Admin | Published: January 13, 2017 03:48 AM2017-01-13T03:48:57+5:302017-01-13T03:48:57+5:30
शहरात मैदानांची अपुरी असलेली संख्या व निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांकडून त्यासाठी एकाच वेळी
पुणे : शहरात मैदानांची अपुरी असलेली संख्या व निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांकडून त्यासाठी एकाच वेळी होणारी मागणी यातून राजकीय कार्यकर्ते व प्रशासनामध्ये अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवतात. यातून मार्ग काढण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून सभा घेता येऊ शकतील अशा ठिकाणांची यादी जाहीर केली जाणार आहे अशी माहिती महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. त्याचबरोबर प्रमुख रस्त्यांवर सभा घेण्यास परवानगी असणार नाही असे कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
शहरातील कोणत्या ठिकाणी राजकीय पक्षांना सभा घ्यायच्या आहेत त्याची यादी महापालिका आयुक्तांनी सर्वच पक्षांच्या प्रतिनिधींकडून मागविल्या आहेत. या ठिकाणांवर सभा घेतल्यामुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही व इतर प्रश्न उद्भवणार नाहीत याची पोलीस प्रशासनाकडून खातरजमा करून घेतली जाणार आहे. त्यानंतर प्रशासनाकडून सभा घेता येऊ शकतील अशा ठिकाणांची यादी जाहीर केली जाईल. शहरातील प्रमुख रस्त्यांवर सभेला परवानगी द्यायची नाही असा धोरणात्मक निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
शहरामध्ये मोठ्या सभांसाठी खूपच कमी मैदाने उपलब्ध आहेत. एकाच वेळी दोनपेक्षा जास्त मोठ्या सभांचे आयोजन करायचे झाल्यास सभेच्या जागांचा मोठा प्रश्न निर्माण होता. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या निवडणुकांसाठी प्रामुख्याने कॉर्नरसभावर भर दिला जातो. या सभांसाठी प्रत्येक प्रभागनिहाय सभांची ठिकाणे प्रशासनाला निश्चित करावी लागणार आहेत. या सभांना परवानगी देताना वाहतूककोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. या जागांसंबंधी पोलिसांचा अभिप्राय घेतला जाणार आहे. निवडणुकीत सभांच्या ठिकाणांमुळे गोंधळ होऊ नये, यासाठी हे नियोजन केले जात असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सभा, पदयात्रा यासाठी रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. सभेसाठी जागा मालकाचे संमतिपत्र, मनपाचा ना हरकत दाखला जोडून अर्ज करावा लागणार आहे. सभेसाठी ध्वनिक्षेपाच्या परवानग्याही घ्याव्या लागणार आहेत. मिरवणुका काढताना एकाच वेळी दोन मिरवणुका, पदयात्रा समोरासमोर येणार नाहीत याचे नियोजन पोलिसांना करावे लागणार आहे, त्यामुळे मिरवणुका काढण्यापूर्वी वेळेत त्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
इच्छुकांना बिनधास्त लुटता येणार संक्रांतीचे वाण
महापालिका निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांकडून मतदारांना केल्या दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या भेटवस्तूंचा खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट होण्याची भीती त्यांना वाटत होती. मात्र निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच त्यांचा निवडणूक खर्चाचा हिशेब द्यावा लागणार असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास २७ जानेवारीनंतर सुरूवात होणार आहे. त्यामुळे इच्छुकांना संक्रांतीचे वाण लुटण्याबरोबरच अर्ज भरेपर्यंतच्या खर्चाचा कोणताच हिशेब द्यावा लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.