कौतुकास्पद! पुण्यात सेरेब्रल पाल्सी, अधूदृष्टी असलेल्या नचिकेतने बजावला मतदानाचा हक्क
By नितीन चौधरी | Published: May 13, 2024 01:36 PM2024-05-13T13:36:09+5:302024-05-13T13:40:56+5:30
मुंढव्यातील केशवनगरमधील फ्लोरिडा इस्टेटमधील नचिकेत सिन्हाचे मतदान केंद्र घराजवळ नसल्याने ते बदलून घराजवळचे मतदान केंद्र द्यावे किंवा वाहनाची व्यवस्था करावी अशी विनंती त्याच्या पालकांनी व्हॉट्सॲप संदेशाद्वारे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना केली होती....
पुणे :मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांना मदत करून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी याचाच प्रत्यय दाखवून देत एका सेरेब्रल पाल्सी आणि अधूदृष्टी असलेल्या नवमतदाराला वाहन तसेच मदतनीसाच्या साह्याने मतदान करण्यास सहकार्य केले.
मुंढव्यातील केशवनगरमधील फ्लोरिडा इस्टेटमधील नचिकेत सिन्हाचे मतदान केंद्र घराजवळ नसल्याने ते बदलून घराजवळचे मतदान केंद्र द्यावे किंवा वाहनाची व्यवस्था करावी अशी विनंती त्याच्या पालकांनी व्हॉट्सॲप संदेशाद्वारे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना केली होती. शारीरिकदृष्ट्या विकलांग (पीडब्ल्यूडी) मतदार असलेला नचिकेतचे मतदार यादीतील नाव यादी भाग ३१- केशवनगर मुंढवा लिटिल आइन्स्टाईन प्रीस्कूलमध्ये होते. मतदान केंद्र बदलून जवळचे देण्याची विनंती त्याचे वडील नीरज कुमार सिन्हा यांनी केली.
दिवसे यांनी याला तत्काळ प्रतिसाद देत मदतनीसासह वाहन नचिकेतकडे पाठवून त्याला मतदानासाठी बूथवर आणण्याची व्यवस्था केली. त्यानुसार त्याचे मतदान करवून घेण्यात आले. मतदानानंतरचा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. मतदानानंतर नीरज कुमार सिन्हा यांनी जिल्हाधिकारी तसेच निवडणूक प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले.