कौतुकास्पद कामगिरी! महाराष्ट्राच्या एनसीसी ग्रुपने पटकावला मानाचा पंतप्रधान बॅनर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 08:10 PM2022-01-28T20:10:11+5:302022-01-28T20:21:27+5:30
प्रजासत्ताक दिन संचलन शिबीरात महाराष्ट्राच्या कॅडेट्सनी डंका गाजवला. महाराष्ट्राच्या एनसीसी ग्रुपने तब्बल सात वर्षानंतर उत्कृष्ट कामगीरी करत मानाचा पंतप्रधान बॅनर बहूनाम पटकावला
पुणे : प्रजासत्ताक दिन संचलन शिबीरात महाराष्ट्राच्या कॅडेट्सनी डंका गाजवला. महाराष्ट्राच्या एनसीसी ग्रुपने तब्बल सात वर्षानंतर उत्कृष्ट कामगीरी करत मानाचा पंतप्रधान बॅनर बहुमान पटकावला. या सोबतच मुंबईची पृथ्वी पाटील हीने देशभरातून अव्वल येत मानाचा गॉड ऑफ ऑनरचा मान पटकावत देशभरातून सर्वोत्कृष्ट कॅडेट ठरली. तर पुण्याचा शंतनु मिसाळ हा देशभरातून चौथा आल्याची माहिती ब्रिगेडीअर आर. के. गायकवाड यांनी दिली.
प्रजासत्ताक दिन संचलन शिबीराच्या निमित्ताने प्रतिष्ठेचा पंतप्रधान बॅनर पटकावण्याचा मान यंदा महाराष्ट्राला मिळाला आहे. दिल्ली येथे शुक्रवारी झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात हा बहुमान प्रदान करण्यात आला. यावर्षी राज्यभरातून जवळपास ५७ कॅडेट्सची निवड प्रजासत्ताक दिन संचलन शिबिरासाठी करण्यात आली होती. अतिशय खडतर प्रशिक्षणानंतर राज्यातील १८ कॅडेट्सना राजपथावर संचलन करण्याचा मान मिळाला. यात सिनीअर डीव्हीजनच्या १० मुले आणि ८ मुलींचा समावेश होता. या विद्यार्थ्यांना लेफ्टनंट कर्नल अनिरुद्ध सिन्हा आणि मेजर आरूष शेटे यांनी मार्गर्शन केले. महाराष्ट्राच्या पथकाने २००२ ते २०१४ दरम्यान सलग सहा वेळा विजेते पद मिळवले होते. यानंतर २०२०, २०२१ मध्ये महाराष्ट्राकडे उपविजेतेपद आले होते आणि आता पुन्हा विजेतेपदाचा मान राज्याच्या एनसीसी कॅडेट्सनी मिळवला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून ५७ छात्रसैनिकांची निवड
शिबिरासाठी यंदा संपूर्ण महाराष्ट्रातून ५७ छात्रसैनिकांची निवड झाली होती. ५७ मध्ये एकूण १३ छात्रसैनिक मुंबईतील आहेत. १३ मध्ये दहा छात्रसैनिक मुंबई ‘ब’ तर तीन छात्रसैनिक मुंबई ‘अ’ गटातील आहेत. या १३ मध्ये १० छात्रसैनिक मुले तर तीन मुली आहेत. मुंबईत एनसीसीचे दोन गट असून त्यामध्ये २१ युनिट्स आहेत. शिबिरात निवड झालेले १३ छात्रसैनिक या २१ युनिट्समधील आहेत.
''प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात संरक्षण दलांच्या संचलन तुकड्यांसह एनसीसीची तुकडीही सहभागी होत असते. या तुकडीतील छात्रांची निवड विशेष शिबिरातून होत असते. हे शिबीर अत्यंत खडतर असते. त्यामुळेच एकूण शिबीरार्थींपैकी जेमतेम पाच ते सात टक्के छात्रांची निवड प्रत्यक्ष संचलनासाठी होते. या विद्यार्थ्यांना पुण्यातील शिबिरात अत्यंत तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले होते. या सोबतच विद्यार्थ्यांनीही मनापासून आणि शिस्तीचे दर्शन घडवत हे यश मिळवले आहे असे ब्रिगेडीअर आर. के.गायकवाड (एनसीसी प्रमुख, पुणे विभाग) यांनी सांगितले.''