कौतुकास्पद! पिंपरी चिंचवड महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

By प्रकाश गायकर | Published: June 28, 2024 03:45 PM2024-06-28T15:45:46+5:302024-06-28T15:46:35+5:30

या स्पर्धेमध्ये विजेती ठरणारी महापालिकेची इंद्रायणीनगर शाळा भारतातील एकमेव सरकारी शाळा ठरली आहे....

Admirable! Pimpri Chinchwad Municipal School Students Project International Award | कौतुकास्पद! पिंपरी चिंचवड महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

कौतुकास्पद! पिंपरी चिंचवड महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

पिंपरी : महापालिकेच्या इंद्रायणीनगर प्राथमिक शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या ड्रेनेज अलर्ट सिस्टीम या प्रकल्पाला ‘कुलेस्ट प्रोजेक्ट’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये ‘कोडींग विथ कमिटमेंट’ या प्रकारात विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये विजेती ठरणारी महापालिकेची इंद्रायणीनगर शाळा भारतातील एकमेव सरकारी शाळा ठरली आहे.

इंद्रायणीनगर महापालिका शाळेतील नैतिक इहारे, श्रावस्ती गायकवाड, निकिता वाघचौरे आणि निकीता थिटे या विद्यार्थ्यांनी गटारे तुंबून सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत असल्याचे बघितले. या समस्येवरील उपाय म्हणून त्यांनी ‘वॉटर फ्लो सेन्सॉर’ आणि ‘पायथन कंप्यूटर लॅंग्वेजचा’ उपयोग करुन प्रकल्प तयार केला. या प्रकल्पाद्वारे गटार तुंबल्याबरोबर अलार्म वाजतो. तसेच त्या संबंधातील संदेश थेट महापालिकेच्या कार्यालयात तक्रार म्हणून नोंदविला जातो. विद्यार्थ्यांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकन मिळाले आहे. शाळा स्तरावर या प्रकल्पासाठी मुख्याध्यापक वंदना ईनांन्नी, वर्गशिक्षक सुरेश धायकर, अविनाश बोडखे आणि पाय फाउंडेशनच्या प्रशिक्षिका स्नेहा वाहुले व मोनाली कुबडे यांनी विशेष परिश्रम घेतले. 

४३ देशांमधून साडेचार हजार प्रकल्प-

कुलेस्ट प्रोजेक्ट ही स्पर्धा लंडन स्थित रास्पबेरी पाय जॅम फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे आयोजित केली जाते. या स्पर्धेमध्ये एकूण ४ हजार ५०० पेक्षा अधिक प्रकल्प जगातील विविध ४३ देशांमधून नोंदविण्यात आले होते. त्यामध्ये इंद्राणीनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी समाजाला भेडसावणाऱ्या स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य या समस्येवर यशस्वीरित्या तोडगा काढला. तसेच शाश्वत विकासाच्या लक्षांवर चांगले कार्य केले म्हणून ‘कोडिंग विथ कमिटमेंट’ या विशेष पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. 

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या सर्जनशील क्षमतेचे उत्तम उदाहरण आहे. कुलेस्ट प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये इंद्रायणीनगरची शाळा ही भारतातून एकमेव सरकारी शाळा विजेती ठरली, ही उल्लेखनीय बाब असून विद्यार्थ्यांनी तयार केलेला हा अभिनव प्रकल्प सार्वजनिक आरोग्याच्या गंभीर समस्येचे जलद पद्धतीने निराकरण करण्यासाठी भविष्यात उपयुक्त ठरणार आहे. त्यांची ही कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे.
- प्रदीप जांभळे, अतिरिक्त आयुक्त,

Web Title: Admirable! Pimpri Chinchwad Municipal School Students Project International Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.