कौतुकास्पद उपक्रम! पुण्यात २३० देहविक्रय करणाऱ्या महिलांना दाखवला मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 07:34 PM2022-03-18T19:34:32+5:302022-03-18T20:44:38+5:30
चित्रपट संपल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य व झालेला आनंद पाहण्यासारखा होता
प्रमोद गव्हाणे
वानवडी :सिनेमा हॉल म्हटलं की तरूणाईची गर्दी तर आलीच पण त्याचबरोबर विविध वयोगटातील रसिक लोकही थिअटरमध्ये जाऊन सिनेमा पाहतात. थिअटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणे हे सामान्यांसाठी अवघड बाब नाही. पण दुसरीकडे समाजातील काही घटकांना तिथे जाऊन सिनेमा पाहणे शक्य होत नाही किंवा त्याची संधी त्यांना मिळत नाही. पण पुण्यात समाजातील अशाच एका घटकाला थिअटरमध्ये सिनेमा दाखवण्यात आला आहे.
मोठ्या लक्झरी बसेस मधून देहविक्रय करणाऱ्या २३० महिला मल्टिप्लेक्समध्ये आल्या आणि त्यांनी चित्रपटाचा अनुभव घेतला. ते क्षण त्यांना आयुष्यातील एका मोठ्या सणासारख्या वाटल्याची भावना या भगिनींनी व्यक्त केल्या. कारण पहिल्यांदाच मल्टिप्लेक्स चित्रपट गृहात त्यांनी चित्रपट अनुभवला होता.
मनजितसिंग विरदी फाऊंडेशनकडून जागतिक महिला दिन पंधरवडा महोत्सव साजरा करत असताना बुधवार पेठ मधील 'देवदासी' तसेच कष्टकरी सफाई कामगार महिलांसाठी गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित केले होते.
स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत पुढे जात आहे. परंतु समाजात असेही काही घटक आहेत ज्या ठिकाणी आजही महिला आपले अस्तित्व पणाला लावताना दिसत आहेत. हे करत असताना शहरातील आधुनिक क्षेत्राची जाण असूनही काही गोष्टी 'ती'ला अनुभवता येत नाही. कारण समाजाचा अशा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो.
समाजात तिला सन्मान मिळावा याहेतूनेच मनजितसिंग विरदी फांऊंडेशनकडून 'तिच्या' सुरक्षिततेची काळजी घेत त्यांच्या जीवनावर आधारीत असलेला गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा बंडगार्डन येथील आयनॉक्स या मल्टिप्लेक्स चित्रपट गृहात दाखवण्यात आला. चित्रपट संपल्यावर तिच्या चेहऱ्यावरील हास्य व झालेला आनंद पाहण्यासारखा होता.