‘आरटीई’तून ६७ हजार ४५९ विद्यार्थ्यांना प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:10 AM2021-04-16T04:10:39+5:302021-04-16T04:10:39+5:30
पुणे : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे ऑनलाइन आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. गुरुवारी पुणे जिल्हा वगळून राज्यातील ६७ ...
पुणे : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे ऑनलाइन आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. गुरुवारी पुणे जिल्हा वगळून राज्यातील ६७ हजार ४५९ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड केली आहे. तर ४२ हजार ५३५ विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. पुण्यातील विद्यार्थ्यांची लॉटरीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक ते दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे.
राज्यात आरटीई प्रवेशाच्या ९६ हजार ६८४ जागा उपलब्ध आहे. त्यासाठी २ लाख २२ हजार ७७३ अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने लॉटरी काढली. बहुतांश सर्व पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशाचे एसएमएस पाठविले आहेत. मात्र, पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई प्रवेशाच्या पोर्टलवर प्रवेश अर्ज क्रमांक टाकून प्रवेशाची स्थिती, कागदपत्रांची तपासणी व प्रवेश घेण्याचा दिनांक याची माहिती प्राप्त करून घ्यावी.
राज्यात आरटीई प्रवेशाच्या पुण्यात सर्वाधिक १४ हजार ७७३ जागा आहेत. या जागांसाठी लॉटरी काढण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही. पुण्यातील जागांसाठी ५५ हजार २५८ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आपल्या पाल्याला प्रवेश मिळाणार का? याबाबत पालकांच्या मनात उत्सुकता आहे. परंतु, लॉटरी प्रक्रिया पूर्ण होण्यास आणखी एक ते दोन दिवस लागणार आहेत. परिणामी पुण्यातील पालकांना प्रवेशासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र, शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या तारखेला लॉटरीची प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे पालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहेत.