विद्यार्थ्यांच्या अट्टहासामुळेच रखडले अकरावीचे प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:15 AM2021-09-14T04:15:06+5:302021-09-14T04:15:06+5:30
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर केला. परिणामी दहावीचा निकाल विक्रमी लागला. विद्यार्थ्यांना ...
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर केला. परिणामी दहावीचा निकाल विक्रमी लागला. विद्यार्थ्यांना ८० ते ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाल्यामुळे त्यांच्या अकरावी प्रवेशाच्या अपेक्षा वाढल्या. मात्र, नामांकित महाविद्यालयातील उपलब्ध जागा पहिल्या व दुसऱ्या फेरीतच भरल्या. परिणामी विद्यार्थ्यांनी घराजवळील कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेशाचा विचार करणे अपेक्षित आहे. परंतु, विद्यार्थी ठरावीक महाविद्यालयांचेच पसंतीक्रम ऑनलाईन अर्जात भरत आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन फेरीतून प्रवेश मिळत नाही, असे इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश समितीच्या सदस्यांकडून सांगितले जात आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयामधील अकरावीच्या ८८ हजार ८४० जागांवरील प्रवेश फेऱ्यांच्या माध्यमातून केले जाणार आहेत. त्यातील केवळ ३२ हजार २०५ जागांवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन फेऱ्यांमधून प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, यासाठी एकापेक्षा अधिक विशेष फेऱ्या घ्याव्या लागणार असल्याचे दिसून येत आहे.