भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश यावर्षीपासून सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 02:55 PM2022-03-18T14:55:21+5:302022-03-18T14:59:47+5:30
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातर्फे ही मंजुरी देण्यात आली आहे...
पुणे :पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट संचलित भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येत आहेत. पहिल्या वर्षी १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातर्फे ही मंजुरी देण्यात आली आहे.
महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या असून यंदाच्या वर्षी १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन प्रत्यक्ष शिक्षण सुरू होणार आहे. महापालिकेने धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी करून ट्रस्टच्या माध्यमातून हे महाविद्यालय सुरू केले आहे. या ट्रस्टवर महापौरांसह पालिकेतील पदाधिकारी आणि गटनेत्यांच्याही समावेश आहे. दरम्यान डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या जागेवर महाविद्यालयाची अद्ययावत इमारत उभारण्यासाठी ६५० कोटी रुपये खर्च महापालिका करणार आहे. तसेच सध्या कमला नेहरू रुग्णालय, बाबूराव सणस कन्याशाळा येथे वर्गखोल्या तयार केल्या असून, तेथेच शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
केंद्र शासन, भारतीय आयुर्विज्ञान परिषद, नवी दिल्ली व राज्य शासन यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाबाबत नियमांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक राहणार आहे. शासकीय वैद्यकीय किंवा तत्सम महाविद्यालयातील कोणत्याही अध्यापकास तो सेवानिवृत्त होईपर्यंत किंवा नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होईपर्यंत संस्थेमध्ये नोकरी देता येणार नाही किंवा त्याच्या सेवा संस्थेस वापरता येणार नाहीत. संस्थेने कोणत्याही परिस्थितीत शासनाने मान्य केलेल्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेश करण्यात येऊ नये, असे नमूद करण्यात आले आहे.