"नीट’ परीक्षा न देता मेडिकलला प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:14 AM2021-09-15T04:14:21+5:302021-09-15T04:14:21+5:30
पुणे : तमिळनाडू राज्याने नीट परीक्षेशिवाय वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्राने सुध्दा हा निर्णय घ्यावा का? ...
पुणे : तमिळनाडू राज्याने नीट परीक्षेशिवाय वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्राने सुध्दा हा निर्णय घ्यावा का? केंद्राने स्वीकारलेल्या धोरणाच्या विरोधात जाणे योग्य आहे का? अशी चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात आहेत. मात्र, पुढील काळात न्यायालयात हा निर्णय टिकणार नाही, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशपातळीवर एकच ''नीट'' परीक्षा घेतली जाते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत एकसूत्रता आली आहे. मात्र, नीट परीक्षेमुळे तमिळनाडू राज्यात एका विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडू सरकारने वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा देण्याची आवश्यकता नसल्याचा कायदा केला. परंतु, या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
--------
तमिळनाडू राज्याने घेतलेला निर्णय धक्कादायक असला, तरी वस्तूस्थितीला धरून आहे. सर्वच गोष्टी केंद्रस्थानी आल्या तर त्यातून काही अडचणी निर्माण होऊ शकतात. तमिळनाडूने बारावीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश देण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळू शकेल. मात्र, बारावीच्या परीक्षेत व वैद्यकीय प्रवेशात पारदर्शकता असणे गरजेचे आहे.
-हरिश बुटले, प्रवेश पूर्व परीक्षांचे अभ्यासक
-------------------------
केंद्रीय स्तरावर घेतलेल्या निर्णयावर प्रत्येक राज्याने स्वतंत्रपणे निर्णय घेणे उचित नाही. इतरही राज्य असाच निर्णय घेण्याचा विचार करू शकतात.
मात्र,गेल्या काही वर्षांपासून नीट परीक्षेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या प्रवेशाची व्यवस्थित घडी बसली आहे. तमिळनाडू सरकारने घेतलेला हा निर्णय लोकप्रिय असला तरी तो न्यायालयात टिकणारा नाही.
- एन. के. जरग, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
---------------------
बारावीच्या परीक्षेत काही ठिकाणी गैरप्रकार होतात. त्यामुळे बारावीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश देणे सयुक्तिक नाही. नीट परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली जाते. त्यामुळे वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा गरजेची आहे.
- तन्वी पवार, विद्यार्थी
-------------------------
प्रत्येक विद्यार्थी प्रवेश पूर्व परीक्षांचा वेगळा अभ्यास करतात. त्यामुळे बारावीच्या आधारे वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देणे चुकीचे ठरेल. प्रत्येक विद्यार्थ्याची गुणवत्ता तपासूनच वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश द्यायला हवा.
- ओम नवले, विद्यार्थी
------
काय आहे निर्णय ?
तमिळनाडूमध्ये वैद्यकीय प्रवेश नीट परीक्षेच्या आधारे दिले जाणार नाहीत. तर खासगी व शासकीय वैद्यकीय संस्थांमध्ये पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश बारावीच्या गुणांच्या आधारे दिले जातील. त्यात सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना ७.५ टक्के प्राधान्य असेल.
----