नव्या वर्षात जम्बो हॉस्पिटलमध्ये नव्या रुग्णांना प्रवेश बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:11 AM2020-12-31T04:11:29+5:302020-12-31T04:11:29+5:30
पुणे : कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने प्रारंभी कोविड केअर सेंटर, क्वारनटाईन सेंटर बंद करणाऱ्या महापालिकेने आता शिवाजीनगर येथील जम्बो ...
पुणे : कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने प्रारंभी कोविड केअर सेंटर, क्वारनटाईन सेंटर बंद करणाऱ्या महापालिकेने आता शिवाजीनगर येथील जम्बो कोविड हॉस्पिटल टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ जानेवारी पासून येथील नवीन रुग्ण प्रवेश बंद करण्यात येणार आहेत.
जम्बो हॉस्पिटलमध्ये प्रवेश बंद केले असले तरी, नवीन रुग्णांना बाणेरच्या कोविड रुग्णालयात आणि ससून रुग्णालयामध्ये दाखल केले जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे. सध्या जम्बो हॉस्पिटलमध्ये १३७ रुग्ण दाखल असून, १ जानेवारीपासून नवे रुग्ण प्रवेश बंद होणार आहेत.
कोट्यवधी रुपयांचा खर्च येत असलेले शिवाजीनगर येथील जम्बो हॉस्पिटल बंद होणार असले तरी, अद्याप पिंपरी चिंचवड येथील जम्बो हॉस्पिटल बाबतचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
कोरोनाच्या रुग्णांची वाढ लक्षात घेता, पुणे महापालिका हॉस्पिटलमध्ये असलेली व्यवस्था पुरेशी आहे. आजमितीला नायडू रुग्णालयासह, बाणेरमधील डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल, लायगुडे आणि दळवी हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या रुग्णांसाठी मनुष्यबळ यांसह पुरेशी उपचार व्यवस्था उपलब्ध आहे.
चौकट
“कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने दिवाळीपूर्वी महापालिकेने उभारलेल्या यंत्रणा आहे तशा ठेऊन ठेवून शहरातील कोविड उपचार केंद्रे टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आली. त्याच पद्धतीने शिवाजीनगरच्या जम्बो कोविड रुग्णालयातील यंत्रणा जागेवर ठेवून रुग्णांचे प्रवेश बंद केले जात आहेत. दररोज जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळतात, त्यातील बहुतांश रुग्ण ‘होम क्वारंटाईन’ होत असल्याने महापालिका रुग्णालयातील खाटा रिकाम्या होत आहेत.”
- रुबल अगरवाल, अतिरिक्त आयुक्त पुणे महापालिका.