शुक्रवारपासून आरटीईचे प्रवेश सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:12 AM2021-06-09T04:12:17+5:302021-06-09T04:12:17+5:30
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश दिले जातात. ...
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश दिले जातात. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील प्रवेशासाठी अर्ज मागवून लॉटरी काढण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष शाळेत जाऊन प्रवेश घेण्याच्या प्रक्रियेला कोरोनामुळे सुरुवात करण्यात आली नव्हती. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शाळेमध्ये गर्दी न करता कोरोनाबाबत शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यावा, अशा सूचना जगताप यांनी दिल्या आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ज्या पालकांना दिलेल्या मुदतीत आपल्या पाल्याचा प्रवेश शाळेत जाऊन करणे शक्य होणार नाही, अशा पालकांनी दूरध्वनी, ई-मेलद्वारे शाळेशी संपर्क साधून प्रवेशाची कार्यवाही करावी. तसेच निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. यासंदर्भातील माहिती आरटीई पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार आहे, असेही जगताप यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.
----------------
लॉटरीतून प्रवेश मिळालेल्या पालकांनी अर्जासोबत जोडलेले कागदपत्रांच्या छायांकित प्रतिसह विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी दिलेल्या मुदतीत शाळेत जायचे आहे. पालकांनी अर्ज भरताना निवासी पत्त्यात चुकीचे अंतर दाखविले असल्यास संबंधित विद्यार्थ्याला प्रवेश देऊ नये, असे जगताप यांनी स्पष्ट केले आहे.