चार वेळा रद्द झालेल्या संयुक्त पूर्वपरीक्षेचे प्रवेशपत्र ‘डाऊनलोड’ होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:14 AM2021-08-26T04:14:46+5:302021-08-26T04:14:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तब्बल चार वेळा रद्द झालेली महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संवर्गातील संयुक्त पूर्वपरीक्षा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तब्बल चार वेळा रद्द झालेली महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संवर्गातील संयुक्त पूर्वपरीक्षा अखेर ४ सप्टेंबरला होणार आहे. यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने बुधवार (दि. २५) पासून परीक्षार्थींसाठी प्रवेश प्रमाणपत्र संकेतस्थळावर उपलब्ध केले आहे. विद्यार्थ्यांनी ते डाऊनलोड करून घ्यावे, असे आयोगाने आवाहन केले आहे. मात्र, पहिल्या दिवशी तांत्रिक अडचणीमुळे प्रवेश प्रमाणपत्र बहुतांश विद्यार्थ्यांना डाऊनलोड झाले नाही.
सन २०२० मध्ये संयुक्त पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली हाेती. कोराेना महामारी, मराठा आरक्षण निकाल, तसेच इतर काही कारणांमुळे गेल्या दीड वर्षात ही संयुक्त पूर्वपरीक्षा चार वेळा रद्द करण्यात आली आहे. पाचव्या वेळी ही परीक्षा होत आहे. एकूण ८०६ जागांसाठी ही परीक्षा होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले मूळ प्रमाणपत्र विद्यार्थ्यांनी सोबत आणणे आवश्यक आहे. त्याशिवाय परीक्षेला प्रवेश दिला जाणार नाही. तसेच, यापूर्वी जाहीर झालेल्या परीक्षांच्या तारखावेळी डाऊनलाेड केलेले प्रवेशपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी २५ ऑगस्ट २०२१ रोजी आयोगाने संकेतस्थळावर उपलब्ध केलेले प्रवेश प्रमाणपत्रच ग्राह्य धरले जाणार आहे. आधीचे प्रमाणपत्र कोणत्याही परिस्थितीत ग्राह्य धरले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
---
धनगर, वंजारी समाजाला कमी जागा
संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी जाहीर झालेल्या जागांमध्ये धनगर आणि वंजारी समाजाला आरक्षणाच्या प्रमाणात जागा जाहीर झाल्या नाहीत, असा आरोप विद्यार्थ्यांनी करत राज्यपाल, मुख्यमंत्री यांना पत्र पाठविली होती. मात्र, त्यात काहीच बदल झाला नाही. या समाजातील विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मात्र, तरीही इतर समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये. यासाठी कोणत्याही प्रकारे विरोध करायचा नाही, असा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
---
संयुक्त पूर्वपरीक्षा या चार वेळी रद्द झाली होती...
* ३ मे २०२०
* ११ ऑक्टोबर २०२०
* २२ नोव्हेंबर २०२०
* ११ एप्रिल २०२१