Adnan Sami: ‘सवाई’च्या स्वरमंचावर प्रथमच निनादले अदनान सामींच्या पियानोचे स्वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 09:05 IST2024-12-23T09:03:23+5:302024-12-23T09:05:47+5:30

मला प्रथमच या जागतिक कीर्तीच्या स्वरमंचावर वादन करण्याची संधी मिळाली, हा मोठा आनंदयोग वाटतो

Adnan Sami's piano sounds were heard for the first time on the stage of 'Sawai' | Adnan Sami: ‘सवाई’च्या स्वरमंचावर प्रथमच निनादले अदनान सामींच्या पियानोचे स्वर

Adnan Sami: ‘सवाई’च्या स्वरमंचावर प्रथमच निनादले अदनान सामींच्या पियानोचे स्वर

पुणे : सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी सायंकाळचे सत्र संगीत कलाकार अदनान सामी यांच्या पियानो वादनाने अनोखे ठरले. पं. मिलिंद चित्ताळ यांच्या गायनालाही श्रोत्यांनी पसंतीची दाद दिली. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडा संकुल येथे ७० वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव सुरू होता.

संगीत क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेल्या अदनान सामी यांच्या ‘सवाई’च्या स्वरमंचावरील सादरीकरणाविषयीची कमालीची उत्सुकता मंडपातील हाऊसफुल्ल गर्दी देत होती. सायंकाळी अदनान सामी यांचे वाद्यासह स्वरमंचावर आगमन होताच मंडपात चैतन्याची लहर पसरली. विशेषत: तरुणाईने अदनान यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

ते किती उदारमतवादी होते, याचे उदाहरण सांगतो. मी पियानोवर भारतीय शास्त्रीय संगीत वाजविण्याचा प्रयत्न करतो, असे मी पं. भीमसेनजींना सांगितले. त्यावर ते प्रतिकूल मत नोंदवणार, असेच मला वाटले होते. पण मी आश्चर्यचकित झालो. कारण, भीमसेनजी म्हणाले, ‘बहुत अच्छा कर रहे हैं.’ परंपरा वाहती ठेवायची असेल तर त्यामध्ये नवे प्रवाह मिसळले पाहिजेत. नवे, वेगळे विचार स्वीकारले पाहिजेत. काळानुरूप योग्य आणि आवश्यक बदल स्वीकारले पाहिजेत, त्यांचे हे विचार किती प्रगल्भ आहेत, अशी आठवण अदनान सामी यांनी सांगितली.

उस्ताद झाकीर हुसेन यांच्या आठवणी सतत जाग्या आहेत. माझा पहिला अल्बम झाकीर भाईंच्या साथीने सजला होता. १२ डिसेंबर रोजी आमची मैफल ठरली होती, जी आता शक्य नाही, अशी खंतही अदनान सामी यांनी व्यक्त केली.

राग यमनमधील रचनेने अदनान सामी यांनी पियानो वादनाला सुरुवात केली. रूपक तालात सुरुवातीला वादन करून त्यांनी द्रूत त्रितालातील रचना पेश केली. तत्पूर्वी प्रसिद्ध गायक पं. मिलिंद चित्ताळ यांनी गायिलेला राग ‘मधुवंती’ त्यांच्या प्रतिभेचे आणि विद्वत्तापूर्ण सादरीकरणाचा प्रत्यय देणारा ठरला. सुरदासांच्या रचनेची अनुभूती रसिकांना देतानाच त्यांनी गुरू पं. फिरोज दस्तूर यांनी गाजवलेल्या ‘गोपाला मेरी करुणा...’ या भक्तिरचनेने गायनाची सांगता केली. त्यांना भरत कामत (तबला), अविनाश दिघे (हार्मोनियम), माउली टाकळकर (टाळ) व प्रवीण कारदगी व अभोगी सेवेकर यांनी तानपुरा साथ केली.

योग्यता, गुणवत्ता यांचा आदर्श म्हणजे भीमसेनजी

मला आज प्रथमच या जागतिक कीर्तीच्या स्वरमंचावर वादन करण्याची संधी मिळाली, हा मोठा आनंदयोग वाटतो. पं. भीमसेनजी आणि माझे विशेष कनेक्शन होते. मी टीन एजर असताना प्रथमच मी त्यांचे गाणे ऐकले आणि भारावून गेलो होतो. खरोखरच ‘भारतरत्न’ हा सन्मान भीमसेनींमुळे अधिक बुलंद झाला आहे. कलेच्या सर्वोच्च गुणवत्तेचा तो दीपस्तंभ आहे. त्यांना कधीही ऐका, त्यांना तोड नाही, ते अजोड आहेत, हे पुन्हा पुन्हा सिद्ध होते. योग्यता, गुणवत्ता यांचा आदर्श म्हणजे भीमसेनजी, असे सामी म्हणाले.

Web Title: Adnan Sami's piano sounds were heard for the first time on the stage of 'Sawai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.