किशोरचे वर्गणीदार दोन हजारांच्या पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:13 AM2021-02-24T04:13:18+5:302021-02-24T04:13:18+5:30
बालभारतीतर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या ‘किशोर’ मासिकाचे हे पन्नासावे वर्ष आहे. मुलांना अवांतर वाचानची गोडी लागावी, त्यांना अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, ...
बालभारतीतर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या ‘किशोर’ मासिकाचे हे पन्नासावे वर्ष आहे. मुलांना अवांतर वाचानची गोडी लागावी, त्यांना अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, त्यांच्यावर विविध मूल्यांचे संस्कार व्हावेत, या हेतूने पन्नास वर्षांपासून मासिक प्रकाशित केले जात आहे. सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला अंक विकत घेणे परवडावे आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत किशोरच्या माध्यमातून ज्ञानाचा आणि मनोरंजनाचा खजिना पोहोचावा, हा यामागील हेतू आहे. त्यामुळे अवघ्या ५० रुपयांत आता हे मासिक वर्षभर दिवाळी अंकासह दरमहा पोस्टाने घरपोच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लहानपणी वाचलेली एक गोष्ट आपल्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकते. मुलांच्या मनाला आनंदित करणारे साहित्य त्यांच्या भावनिक, बौद्धिक, वैचारिक विकासासाठी आवश्यक असते. कोवळ्या आणि सर्जनशील मनाची मशागत करण्याचे महत्त्वाचे काम हे मासिक करू शकते. तसेच मुलांच्या सर्वांगाने फुलण्याच्या काळात त्यांना नक्कीच किशोरची मदत होऊ शकेल. त्यामुळे वाचनसंस्कृती वाढीसाठी आणि मराठी भाषेच्या समृद्धीसाठी किशोरचे वर्गणीदार व्हावे, असे आवाहन किशोरचे संपादक किरण केंद्रे यांनी केले आहे.