गाव दत्तक घेतलं अन् पोरकं सोडलं!
By admin | Published: October 5, 2015 01:57 AM2015-10-05T01:57:48+5:302015-10-05T01:57:48+5:30
सांसद आदर्श गाव योजनेत राज्यात सर्वांत जास्त ८ गावे असलेला एकमेव जिल्हा असला तरी ही योजना सुरू होऊनही ठोस अशी कामे होत नसल्याने ‘दत्तक घेतलं, पोरकं सोडलं’ अशी भावना येथील ग्रामस्थांची झाली आहे
बापू बैैलकर, पुणे
सांसद आदर्श गाव योजनेत राज्यात सर्वांत जास्त ८ गावे असलेला एकमेव जिल्हा असला तरी ही योजना सुरू होऊनही ठोस अशी कामे होत नसल्याने ‘दत्तक घेतलं, पोरकं सोडलं’ अशी भावना येथील ग्रामस्थांची झाली आहे. आराखडे तयार झाले असून कामे अद्याप निविदा प्रक्रियेतच अडकली आहेत.
जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील करंदी शिवाजीराव आढळराव पाटील, हवेलीतील वडगाव शिंद अनिल शिरोळे, जुन्नर तालुक्यातील टिकेकरवाडी माजिद मेमन, दौंड तालुक्यातील दापोडी सुप्रिया सुळे, मावळ तालुक्यातील सदुंब्रे
वंदना चव्हाण, बारामतीतील मुर्टी डी. पी. त्रिपाटी, शिरूरमधील जांबूत संजय काकडे आणि पुरंदरमधील गुळूंचे अशोक गांगुली यांनी दत्तक घेतले आहे. ११ आॅक्टोबर २०१४ रोजी ही योजना कार्यान्वीत झाली असून ही गावे आॅक्टोबर २०१६ पर्यंत आदर्श करावयाची आहेत.
मात्र, वर्षे शिल्लक राहिले असताना येथे फक्त ग्रामविकास आराखडे, बेसलाईन सर्व्हे झाले असून आता कुठे निविदा प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. कामे आलीच नाहीत व झालीही नाहीत, अशा भावना यातील काही गावांच्या ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. दोन वर्षे आराखड्यात गेले. आता कुठे कामांना सुरूवात होत आहे. मात्र, आता ती किती जोमाने होतील व झाली तर ती दर्जेदार असतील का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
दापोडीचे सरपंच राजेंद्र नरोटे यांनी सांगितले की, कामांना आता वेग आला आहे. अंगणवाड्या, वाचनालय, प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. उद्या पोस्ट आॅफीसचे उद्घाटन होणार आहे. नाला खोलीकरणाचीही कामे चांगली झाली आहेत.
या योजनेचा नुकत्याच झालेल्या दक्षता समितीच्या बैठकीत आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांनी या गावांतील ८ प्रकारचे आराखडे केले आहेत.
यात राज्य व केंद्र सरकारच्या एकत्रीत योजनांचा लाभ देण्यात येणार
असून यात फक्त भौतिक सुधारणा न करता गावचे वातावरणच बदलण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे
सांगितले. या वेळी आमदार पाचर्णे यांनीही या गावांचे बजेट २९ कोटींपर्र्यत असून प्रत्यक्ष २ कोटी खर्च होतोय, मग विकास कसा होणार, असा प्रश्न उपस्थित केला होता.
खासदार आढळराव पाटील यांनीही ग्रामस्थांच्या भावना पोरकं सोडल्याच्या आहेत, मात्र आता येथे विकासकामे झपाट्याने होणार
असून ग्रामस्थांना गावातच रोजगार
उपलब्ध करून ती गावे स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
पत्रं फक्त येतात...
मुर्टी गावचे माजी उपसरपंच तानाजी खोमणे यांनी सांगितले, अद्याप एकही काम सुरू झाले नाही. खासदारसाहेब या योजनेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आले होते. ते पुन्हा फिरकले नाहीत. ग्रामपंचायतीला एवढा निधी मिळणार आहे, अशी पत्र फक्त येत आहेत. बरेच प्रस्ताव दिले आहेत. मात्र कोणत्याच कामासाठी पैैसे आले नाहीत.