ॲड. प्रवीण चव्हाण यांचे ‘धमकी’कांड उजेडात! पुण्यातील महिला पीआयसह फॉरेन्सिक ऑडिटरच्याही तक्रारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 11:47 AM2023-01-29T11:47:44+5:302023-01-29T11:49:03+5:30
Praveen Chavan: पुण्यातील पोलिस यंत्रणांसह फॉरेन्सिक ऑडिटर महिला अधिकाऱ्यांनीही तत्कालीन विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्या ‘दबंगगिरी’विषयी वेळोवेळी वरिष्ठांकडे तक्रारी नोंदविल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे.
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील अपहार व आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पुण्यातील पोलिस यंत्रणांसह फॉरेन्सिक ऑडिटर महिला अधिकाऱ्यांनीही तत्कालीन विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्या ‘दबंगगिरी’विषयी वेळोवेळी वरिष्ठांकडे तक्रारी नोंदविल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर क्राइमच्या आयुक्तांकडे दाखल तक्रारींनुसार ॲड. चव्हाण यांच्या अरेरावीसह दबाव टाकण्यासाठी धमकीही भरल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक सुचेता खोकले आणि चार्टर्ड अकाउंटंट व फॉरेन्सिक ऑडिटर नेहा संतोष फडके यांनी केलेल्या तक्रारी ‘लोकमत’च्या हाती लागल्या आहेत. २७ मे २०२२ रोजी या दोन्ही अधिकाऱ्यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्याकडे जबाब नोंदवीत ॲड. चव्हाण यांच्याविरोधात तक्रारी केल्या आहेत. बीएचआर पतसंस्थेतील अपहार आणि आर्थिक फसवणुकीसंदर्भात डेक्कन पोलिसात दाखल गुन्ह्याचा तपास सुचेता खोकले यांच्याकडे होता.
या तक्रारी अर्जातील माहितीनुसार ८ मार्च २०२२ रोजी न्यायालयाने एका कर्जदाराने सादर केलेल्या अर्जाविषयी माहिती घेण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिटर नेहा फडके यांना बोलाविले. त्यानुसार फडके व खोकले यांनी ॲड. चव्हाण यांना ही माहिती कळविली. तेव्हा त्यांनी आधी माझ्या कार्यालयात जाऊन माहिती द्यावी आणि त्यानंतर न्यायालयात जाण्याच्या सूचना केल्या. फडके यांनी कौटुंबिक अडचण सांगून सरळ न्यायालयात जाते म्हणून विनंती
केली.
तेव्हा ॲड. चव्हाण यांनी तुम्हाला कार्यालयात जावेच लागेल. अन्यथा ऑडिटर सहकार्य करीत नाहीत, अशी तक्रार शासनाकडे करावी लागेल, असे प्रत्युत्तर दिले. न्यायालयात या आणि आम्ही माहिती देतो, असे सांगितल्यावर ॲड. चव्हाण यांनी ‘पुढील तारीख घ्या’ म्हणून उद्धट उत्तर दिले.
त्यानंतर न्यायालयात खोकले आणि फडके गेल्या. तिथे ॲड. चव्हाणही आले. त्यांनी ॲड. चव्हाणांची भेट घेतली. तेव्हा तुम्ही न्यायालयास चुकीची माहिती दिली म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल करतो, अशी चव्हाण यांनी धमकी भरली.
ॲड. चव्हाणांच्या वृत्तीवरही ठेवले बोट
वेळेवर अहवाल दाखल न करणे, सुनावणीकामी उपस्थित न राहणे किंवा उपस्थित राहून तारीख घेणे अशा ॲड. चव्हाण यांच्या वृत्तीमुळे न्यायालयाने वारंवार नाराजी व्यक्त केली आहे. हा विलंब उचित नसल्याने या सर्व प्रकरणाचे अहवाल वरिष्ठांच्या स्वाक्षरीने न्यायालयात दाखल केले आहेत, यासंदर्भात स्टेशन डायरीत नोंद व्हावी, अशी विनंती खोकले यांनी नियंत्रण कक्षाकडे केली होती.
तपासात सहकार्य नाही
ॲड. चव्हाण यांनी फॉरेन्सिक ऑडिटर व तपासी अधिकारी सहकार्य करीत नसल्याची तक्रार न्यायालयासमोर केली. तेव्हा ॲड. चव्हाण यांनी चढ्या आवाजात दबाव टाकायला सुरुवात केली. खोकले आणि फडके यांना त्यांच्या कार्यालयात नेले.
या गंभीर प्रकारानंतर सुचेता खोकले आणि नेहा फडके यांनी वरिष्ठांकडे तक्रार मांडली. ॲड. चव्हाण यांनी न्यायालयीन कामकाजात केलेले वर्तन मनोधैर्य खच्चीकरण करणारे असून, त्यांच्या वर्तनाबाबत त्यांना समज देऊन त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, अशी विनंतीही खोकले आणि फडके यांनी केली.