राजगुरुनगर येथे वकिलाची भीमानदीत उडी मारून आत्महत्या; कारण उद्याप अस्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 01:09 PM2020-06-17T13:09:29+5:302020-06-17T13:10:03+5:30
राजगुरूनगर येथील जिल्हा न्यायालयात चंद्रशेखर हे वकील म्हणून कार्यरत होते..
राजगुरुनगर: राजगुरुनगर (ता. खेड ) येथे भिमा नदीच्या पुलावरून उडी आत्महत्या केली असल्याची घटना (दि. १६ रोजी ) घडली आहे.
चंद्रशेखर कोंडीबा टाकळकर (वय ४६ )रा. तिन्हेवाडी रोड राजगुरुनगर असे आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव आहे.मात्र, अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. याप्रकरणी मृत चंद्रशेखर टाकळकर यांचा भाऊ अमित कोंडिबा टाकळकर याने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजगुरूनगर येथील जिल्हा न्यायालयात चंद्रशेखर हे वकील म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १६ ) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास खेड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर टाकळकर यांनी भीमानदीच्या केदारेश्वर जुन्या पुलावरून पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या एका वकिलाने हा प्रकार पाहिल्यानंतर ही घटना समोर आली. या घटनेनंतर राजगुरुनगर शहरातील वकील व ग्रामस्थ, पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रथम काही तरुणांनी नदीच्या पाण्यात बुडी मारून तसेच काठीच्या सह्याने पाण्यात शोध घेतला. मात्र, तो अयशस्वी ठरला. बंधारा पाण्याने तुडुंब भरला असल्याने तसेच पाण्यात जलपर्णी असल्याने शोध कार्यात मोठा अडथळा निर्माण होत होता. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
त्यानंतर लोंखडी गळ टाकून शोध घेण्यात आला अखेर दोन तासाने नगर परिषद कर्मचारी, पोलिस व नागरिकांच्या मदतीने टाकळकर यांचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून मृत चंद्रशेखर टाकळकर यांचा भाऊ अमित कोंडिबा टाकळकर यांने खेड पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. चंद्रशेखर टाकळकर हे राजगुरूनगर येथील जिल्हा न्यायालयात वकील म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मुत्यूने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे...