मोक्का कारवाई केलेल्या दीप्ती काळेचा ससूनच्या ८ व्या मजल्यावरुन पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 06:28 PM2021-04-27T18:28:52+5:302021-04-27T20:23:32+5:30

पळून जाताना खाली पडून मृत्यु

Advocate Deepti Kale commits suicide from the eighth floor of Sassoon Hospital in Pune | मोक्का कारवाई केलेल्या दीप्ती काळेचा ससूनच्या ८ व्या मजल्यावरुन पडून मृत्यू

मोक्का कारवाई केलेल्या दीप्ती काळेचा ससूनच्या ८ व्या मजल्यावरुन पडून मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांच्या सरंक्षणात असताना मृत्यु झाल्याचे याची नियमानुसार सीआयडीमार्फत चौकशी होणार

पुणे : आजच मोक्का कारवाई झालेल्या दीप्ती काळे हिचा ससून रुग्णालयातील ८ व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. ही घटना दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली.

मराठे ज्वेलर्सचे मिलिंद मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात दीप्ती काळे हिला पोलिसांनी अटक केली होती. दीप्ती काळे हिला कोरोनाची लागण झाल्याने तिच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. आज दुपारी ती कपडे धुण्यासाठी बाथरुममध्ये गेली होती.  जवळपास २० मिनिटे झाली तरी दीप्ती बाहेर न आल्याने गार्डने आतील कानोसा घेतला़ परंतु, आतून काहीही आवाज येत नव्हता. तेव्हा इतरांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला तर बाथरुमच्या खिडकीच्या काचा काढून ठेवलेल्या दिसून येत होत्या. ती खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. 
याच दरम्यान, खाली एका महिलेचा पडून मृत्यु झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी खाली जाऊन पाहिल्यावर ती दीप्ती काळे असल्याचे निष्पन्न झाले. हे लक्षात येताच सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. 

सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांनी सांगितले की, दीप्ती काळे हिने खिडकीतून बाहेर पडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. बाथरुमच्या डकमध्ये अरुंद जागा आहे. तेथील पाईपावरुन तिने खाली उतरण्याचा प्रयत्न केला असावा व त्यातून ती खाली पडून तिचा मृत्यु झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. 

पोलीस आयुक्त सागर पाटील यांनी सांगितले की, दीप्ती काळे हिला कोरोनाची लागण झाल्याने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारी ती अंघोळ व कपडे धुण्यासाठी बाथरुममध्ये गेली होती. तेथील खिडकीतून तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यात खाली पडून तिचा मृत्यु झाला.

दीप्ती काळे आणि निलेश शेलार यांना विश्रामबाग पोलिसांनी १८ एप्रिल रोजी अटक केली होती. ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले असताना दीप्ती काळे हिने औषधांच्या गोळ्या घेतल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे तिची कोरोना चाचणी केल्यावर ती पॉझिटिव्ह आल्याने तिच्यावर उपचार करण्यात येत होते. 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार आजच दीप्ती काळे, निलेश शेलार यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. 

अ‍ॅड. काळे हिने इतरांच्या मदतीने बांधकाम व्यावसायिकाशी शारीरीक जवळीक साधून त्यांच्याकडून जबरदस्तीने ४२ गुंठे जमीन स्वत:च्या नावावर करुन घेतली. तसेच आणखी ५८ गुंठे जमीन नावावर करुन देण्यासाठी धमकाविल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

दीप्ती सरोज काळे (रा. बावधन), निलेश शेलार (रा. कोथरुड), नितीन हमने व दोघा अनोळखी व्यक्तीविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिने बांधकाम व्यावसायिकाशी जवळीक साधून त्याच्याबरोबर संबंध प्रस्तापित केले होते. त्याला बांधकाम व्यवसायासाठी ३५ लाख रुपये दिले. त्या बदल्यात मरकळ येथील ४२ गुंठे जमीन स्वत:च्या नावावर करुन घेतली होती. त्यानंतर उरलेली ५८ गुंठे जमीन आपल्या नावावर कर, म्हणून दीप्ती काळे व तिचे साथीदार या बांधकाम व्यावसायिकाला धमकावित होते. 

काही वर्षांपूर्वी पुण्यातील मध्य वस्तीतील एका राजकीय पक्षाच्या नेत्याविरुद्ध अशाच प्रकारे बलात्काराचा आरोप करुन तिने खळबळ उडविली होती. त्यानंतर तिच्याविरुद्ध खंडणी व फसवणुकीचा गुन्हा डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. 

दीप्ती काळे ही टोळीप्रमुख असून मागील १०  वर्षात संघटित गुन्हेगारी टोळी तयार करुन प्रत्येक गुन्ह्यांमध्ये वेगवेगळे सदस्य घेऊन खुनाचा प्रयत्न, आत्महत्येस प्रवृत्त करणे, कट करुन खंडणी व बनावट व्हिडिओ तयार करुन अपलोड करणे असे गुन्हे केले आहेत. त्यामुळे पोलिसांनी तिच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती.

Web Title: Advocate Deepti Kale commits suicide from the eighth floor of Sassoon Hospital in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.