तब्बल दीड वर्षांनी पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमानाचे उड्डाण; पुणे-दुबई विमानसेवा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 10:20 AM2021-11-18T10:20:21+5:302021-11-18T10:28:34+5:30
कोरोना पूर्वी पुणे विमानतळावरून दुबई साठी दररोज चार विमानांची उड्डाणे होत. मात्र कोरोनाच्या काळात आंतर राष्ट्रीय विमानाची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती...
प्रसाद कानडे
पुणे: कोरोनाच्या काळात बंद झालेली पुण्याची आंतरराष्ट्रीय हवाई सेवा आता पुन्हा सुरु होत आहे. पुणे विमानळावरून दुबईसाठी हवाईसेवा सुरु होत आहे. स्पाईसजेटला दुबई विमानतळावर स्लॉट देखील उपलब्ध झाला आहे. पुण्याहून दररोज ७ वाजून ५० मिनीटांनी दुबईच्या दिशेने विमान झेपवणार असल्याने सुमारे दीड वर्षाच्या कालावधीनंतर पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमानाचे उड्डाण होणार आहे.
कोरोना पूर्वी पुणे विमानतळावरून दुबई साठी दररोज चार विमानांची उड्डाणे होत. मात्र कोरोनाच्या काळात आंतर राष्ट्रीय विमानाची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. देशांतर्गत वाहतूक सुरु झाल्या नंतर आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक सुरु व्हावी अशी प्रवाशांची मागणी होती.
मात्र त्यास डीजीसीएची परवानगी मिळत नव्हती. शिवाय आंतरराष्ट्रीय नियम देखील शिथिल झाले नव्हते. आता परिस्थिती सामान्य झाली आहे. त्यामुळे पुणे विमानतळावरून दुबईसाठी प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी मिळाली असून त्याचा स्लॉट देखील निश्चित झाला आहे. लवकरच याची तारीख जाहीर होणार असून प्रवाशांना तिकीट बुक करता येणार आहे.
अन्य कंपन्याचीदेखील तयारी सुरु-
पुणे- दुबई साठी विमानसेवा देणाऱ्या अन्य कंपन्या देखील विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसा प्रस्ताव त्यांनी विमानतळ प्रशासनाकडे पाठविला आहे. तो प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी डीजीसीएकडे पाठविला असून त्यास मंजुरी मिळाल्यानंतर दुबईसाठी आणखी विमानांची उड्डाणे होणार आहेत. त्यामुळे तिकीट दर कमी होतील.