ममतेची अनुभूती देणारी आभाळमाया
By admin | Published: May 15, 2017 06:36 AM2017-05-15T06:36:56+5:302017-05-15T06:36:56+5:30
काहींचे आई-वडिलांचे छत्र हरपलेय, तर काहींना माता पिता, नातेवाईक असूनही आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने सांभाळणे शक्य नाही
मंगेश पांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी-चिंचवड : काहींचे आई-वडिलांचे छत्र हरपलेय, तर काहींना माता पिता, नातेवाईक असूनही आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने सांभाळणे शक्य नाही. अशा अनाथ, गरीब, गरजू, उपेक्षित मुलींसाठी मावळ तालुक्यातील आभाळमाया ही संस्था आधार ठरली आहे. त्यांच्यासाठी ही संस्था आभाळमायाच आहे.
मावळ तालुक्यातील पाचाणे येथे शांताई शिक्षण प्रसारक मंडळाची आभाळमाया ही संस्था आहे. अक्षरओळख नसलेल्या शांताबाई येवले या आजीबाई अत्यंत सचोटीने या संस्थेचा कारभार पाहातात. मुलींचे संगोपन करीत आहेत. केवळ त्यांची निवासाची, जेवण, खाण्याची, शिक्षणाची सोयच नाही तर त्या मुलींना माता पित्याचे प्रेम देत आहेत. संस्थेस भेट देणाऱ्यांना या मुलींच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह दिसून येतो. या संस्थेप्रमाणेच समाजाकडेही त्या ‘आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ अशा भावनेतून आपले भाव व्यक्त करताना दिसून येतात.
येवले यांनी २००३ ला ही संस्था स्थापन केली आहे. कोणाला त्यांची आई बालपणीच सोडून गेली आहे, तर कोणाचे मातापिता दुरावले आहेत, काहींचे मातापिता आहेत, पण गरिबीमुळे ते त्यांचा सांभाळ करण्यास असमर्थ ठरले आहेत. भूमिहीन झाल्याने कुटुंबाचा गाडा हाकताना, ओढाताण होते, त्यामुळे मुलींना काहींनी संस्थेत दाखल केले आहे. वंचित घटकातील मुलींना आधार देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळ देण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून अव्याहतपणे सुरू आहे. शांताबाई यांच्या या कार्याला एक तपाचा कालावधी लोटला आहे.