१७ दिवसांनंतर फरार ललितला मुंबई पोलिसांनी बंगळुरू येथून ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 11:48 AM2023-10-19T11:48:27+5:302023-10-19T11:49:01+5:30
बुधवारी ललित पकडला गेला नसता तर तो चेन्नई येथून श्रीलंकेत पळून जाण्याच्या तयारीत होता अशी माहिती समोर आली
पुणे: ड्रग्ज तस्कर आणि फरार आरोपी ललित पाटील याला पकडण्यात १७ दिवसांनंतर अखेर मुंबईच्या साकीनाका पोलिसांना पकडण्यात बुधवारी यश आले. ललित बंगळुरू येथून चेन्नईला पसार होण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला पकडले. दरम्यान बुधवारी त्याला अंधेरी न्यायालयात हजर केले असता सोमवार (२३ ऑक्टोबर) पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. दरम्यान, ललितच्या ससून मधून पसार झाल्यानंतर पुणे पोलिसांची १० पथके त्याच्या मागावर होती. यासह मुंबई आणि नाशिक पोलिस देखील त्याचा शोध घेत होते. अखेर मुंबई पोलिसांना ललितला पकडण्यात यश आले.
ससून रुग्णालयाच्या गेटसमोरून गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ३० सप्टेंबर रोजी अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त केला होता. यावेळी पोलिसांनी १ किलो ७१ ग्रॅम ५३ मिलीग्रॅम वजनाचे मॅफेड्रॉन (एम डी) जप्त केले. ससून रुग्णालयाच्या गेटजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचा साठा सापडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी झारखंड येथील सुभाष जानकी मंडल (२९, रा. देहूरोड, मुळ गाव. झारखंड) आणि रौफ रहीम शेख (१९, रा. ताडीवाला रोड) या दोघांना अटक केली होती. चौकशी दरम्यान सुभाषने हे ड्रग्ज ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १६ मध्ये उपचारासाठी दाखल असलेला येरवडा कारागृहातील कैदी ललित अनिल पाटील (३४) याचे असल्याचे सांगितले होते. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसात ते आठच्या सुमारास ललित पाटील याने ससून मधून पलायन केले होते. तेव्हापासून तीन जिल्ह्याचे पोलिस त्याचा शोध घेत होते.
याआधी पकडले होते २० किलो चे मॅफेड्रोन…
चाकण परिसरातील शेलपिंपळ गाव येथे ७ ऑक्टोबर २०२० रोजी २० कोटी रुपयांचे २० किलो मॅफेड्रोनसोबत पकडले होते. याच प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या ललितची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान एकूण २२ आरोपींना पकडण्यात आले होते. परंतू या कारवाईच्या तिसऱ्या दिवशी ललितने जिन्यातून पडल्याचे कारण सांगत ससूनचा रस्ता धरला होता. तेव्हापासून बराच काळ ललितने उपचारासाठी म्हणून ससूनमध्येच काढला होता, त्यानंतर त्याने तेथूनच पलायन केले.
बंद पडलेल्या कारखान्यांमध्ये बनवत होते ड्रग्ज..
प्रामुख्याने मॅफेड्रोन हे ड्रग्ज बाहेरच्या देशातून भारतात आणले जाते. ललितकडे मात्र हे ड्रग्ज बनवण्यासाठी तज्ज्ञ लोकांची टीम होती. त्याचा भाऊ भूषण हा एमडी चे उत्पादन करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. ललितने याआधी रांजणगाव येथील कारखान्यात १३२ किलो मॅफेड्रोन बनवले होते, त्यातील ११२ किलो मॅफेड्रोन त्याने विकले होते, तर २० किलो पोलिसांना सापडले होते. त्यानंतर ललित आणि भूषण यांच्या नाशिक येथील शिंदे गावातील कारखान्यावर मुंबई पोलिसांनी छापा मारत ३०० किलोचे एमडी जप्त केले होते.
१० ऑक्टोबर रोजी पुणे पोलिसांना यश..
ललित पाटील याला साथ करणारा आणि मॅफेड्रॉन बनवण्यात तरबेज असणारा त्याचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने १० ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यातील बारा बनकी (नेपाळ पॉर्डर) येथून ताब्यात घेतले होते. सध्या हे दोघेही पुणे पोलिसांच्या कोठडीत आहेत.
भूषण पाटील हाच मास्टरमाईंड..
भूषण पाटील हा ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख मास्टर माईंड आहे. भूषण हा केमिकल इंजिनिअर असून तोच एम डी हे ड्रग्ज तयार करत होता. मूळ नाशिक येथील आणि सध्या एका ड्रग्जच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात असणाऱ्या अरविंद कुमार लोहारे याने भूषण पाटील याला ड्रग्ज बनवण्याचे प्रशिक्षण दिले होते. ड्रग्ज तयार करण्याचे काम भूषण करत होता तर ते विकण्याचे काम ललित पाटील करत होता. तसेच अभिषेख बलकवडे हा भूषण सोबत आर्थिक व्यवहार पाहत होता.
मी ससून मधून पळालो नाही...
ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी पकडल्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी रुग्णालयात नेत असताना त्याने माध्यमांशी बोलताना, मी ससून मधून पळालो नव्हतो तर मला पळवलं गेलं असे त्याने सांगितले. तसेच यामध्ये कुणाकुणाचा सहभाग आहे हे देखील सगळं सांगणार असल्याचे त्याने सांगितले.
ससून मधून पळाल्यानंतर ललित काही दिवस नाशिकमध्ये...
ललितने ससून रुग्णालयातून पळ काढल्यानंतर तो सर्वप्रथम नाशिकला गेले. तेथे काही दिवस जाऊन थांबून इंदौर आणि गुजरातला गेला. तेथून पुन्हा तो नाशिक, धुळे, छत्रपती संभाजीनगर मार्गे कर्नाटक येथे आला. बुधवारी कर्नाटक येथून चेन्नईला पळून जाण्याच्या तयारीत असताना साकीनाका पोलिसांनी त्याला पकडले. जर, बुधवारी ललित पकडला गेला नसता तर तो चेन्नई येथून श्रीलंकेत पळून जाण्याच्या तयारीत होता अशी माहिती समोर आली आहे.
पुणे पोलिसांकडून जिवाला धोका?
ललितने बुधवारी अंधेरी न्यायालयात पुणे पोलिसांकडून आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगितले, असे न्यायालयात उपस्थित असणाऱ्या एका वकिलाने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अंधेरी न्यायालयात नेमकं काय झालं?
सरकारी वकिलांनी या सगळ्या ड्रग्ज प्रकरणात साकीनाका पोलिसांना पुढील चौकशीसाठी ललित पाटील याची रिमांड मिळावी, अशी मागणी न्यायालयासमोर केली. नाशिक येथील कारखान्यावर झालेल्या ड्रग्ज कारवाई मध्ये ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरवण्यासाठी जो आरोपी मदत करत होता त्याने ललित पाटीलचे नाव चौकशी दरम्यान घेतले आहे. त्यामुळे ड्रग्ज प्रकरणात ललित पाटील याचा मोठा रोल आहे. तो ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार आहे आणि त्याच्यावर मुंबई, पुणे, नाशिक पोलिसात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी मुंबई पोलिसांना करायची असल्याचे सरकारी वकील यांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायालयाने त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्याचे आदेश दिले.