२0 तासांच्या प्रयत्नानंतर तिघांचे मृतदेह सापडले, नातेवाईक मुळशीत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 05:10 PM2018-04-26T17:10:12+5:302018-04-26T18:17:52+5:30
चेन्नईतील ए.सी.एस मॅट्रिक्युलेशन शाळेचे विद्यार्थी शिबिरासाठी मुळशीमधील कातरखडक या गावी जॅकलिन स्कुल आॅफ थॉट या ठिकाणी आलेले होते. आठ दिवस हे शिबीर येथे घेण्यात येणार होते.
पौड : मुळशीत उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या चेन्नई येथील तीन शाळकरी मुलांचा धरणात पडून दुर्दैवी मृत्यू झाला असून २0 तासांच्या शोधमोहिमेनंतर तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. काल घटनेनंतर पहिला मृतदेह लगेच सापडला होता. डॅनिश राजा (वय १३), संतोष के. (वय १३), सर्वान्ना (वय १३ ) असे मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. यातील डॅनिश राजा याचा मृतदेह बुधवारी घटनेनंतर गावकºयांनी शोधून काढला होता. दरम्यान, या विद्यार्थ्यांचे नातेवाईक चैैनईवरून आज सकाळी घटनास्थळी पोहचले आहेत.
चेन्नईतील ए.सी.एस मॅट्रिक्युलेशन शाळेचे विद्यार्थी शिबिरासाठी मुळशीमधील कातरखडक या गावी जॅकलिन स्कुल आॅफ थॉट या ठिकाणी आलेले होते. आठ दिवस हे शिबीर येथे घेण्यात येणार होते. यासाठी १३-१५ वयोगटातील २० विद्यार्थी याठिकाणी आलेले होते. त्यांच्यासोबत एक शिक्षक तर तीन शिक्षिका असे चार जण सोबत आलेले आहेत. शिबिराचा बुधवारी पहिलाच दिवस होता. येथून जवळच असलेल्या कातरखडक या धरणावर सर्वजण फिरायला गेले होते. दुपारी २ वाजता यातील काही विद्यार्थी पाण्यात उतरले असता, यातील वरील तिघे विद्यार्थी बुडाले. घटनेची माहिती समजताच गावातील मंडळी तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या शोधमोहिमेत एका विद्यार्थ्यांचा मृतदेह सापडला होता. सायंकाळपर्यंत शोधकार्य सुरु होते. मात्र दोघांचा शोध लागला नाही. रात्री अंधार झाल्याने शोध काम थांबविण्यात आली. गुरूवारी सकाळी मुळशी प्रतिष्ठाण व आपत्ती व्यवस्थापन पथकाने शोध मोहीम सुरू केली. यात आणखी एक मृतदेह सापडला. त्यानंतर एनडीआरफचे पथक दाखल झाले. त्यांनी तिसरा मृतदेह बाहेर काढला.
काल सापडलेल्या एका विद्यार्थ्याचे शवविच्छेदन करण्यात आले असून आता सापडलेल्या दोघांचे शवविच्छेदन पौैढ ग्रामीण रूग्णालयात करण्यात येत आहे. यानंतर ते मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असून मुंबईतून विमानाने चेन्नईला पाठविण्यात येणार आहे.