अडीच वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण केल्यानंतर बलात्कार करून पुण्यात चिमुकलीचा निर्घृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 06:26 AM2017-10-23T06:26:50+5:302017-10-23T06:27:18+5:30
पुणे : घरात आई-वडिलांशेजारी झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून, तिच्यावर बलात्कार आणि निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना धायरी भागात घडली.
पुणे : घरात आई-वडिलांशेजारी झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून, तिच्यावर बलात्कार आणि निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना धायरी भागात घडली. शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडलेला हा घृणास्पद प्रकार रविवारी सकाळी चिमुरडीचा मृतदेह आढळल्यानंतर उघडकीस आला. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी २० ते २५ जणांची कसून चौकशी सुरू होती.
श्रुती विजय शिवगणे (वय अडीच वर्षे) असे खून झालेल्या चिमुकलीचे नाव असून वडील विजय (३२, रा. लगडमळा, वडगाव धायरी) यांनी याची फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध बलात्कार व खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.
विजय शिवगणे हे मूळचे परभणी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दोन महिन्यांपूर्वी पोटाची खळगी भरण्यासाठी ते पुण्यात आले होते. सध्या ते सिंहगड रस्त्यावरील वडगाव धायरीजवळ राहत होते. समृद्धी हॉटेलमध्ये ते वेटर म्हणून काम करतात, तर आई विद्या जवळच्याच मंडईमध्ये भाज्या विकतात.
दिवाळीनिमित्त शनिवारी त्यांच्याकडे श्रुतीचा मामा राहण्यास आला होता. घरामधील सर्व जण झोपल्यानंतर दरवाजा उघडून घरामध्ये घुसलेल्या अज्ञात आरोपीने श्रुतीला उचलून नेले. रात्री बारा-सव्वाबाराच्या सुमारास विद्या यांना जाग आली, तेव्हा श्रुती त्यांच्याजवळ नव्हती. सर्वांनी शोधाशोध करूनही ती न सापडल्याने, पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला. अखेर पहाटे साडेसहाच्या सुमारास परिसरात काही ठिकाणी रक्ताचे डाग आढळले. पोलिसांनी शोध घेतला असता तिचे कपडे मिळाले आणि तेथून काही अंतरावरच श्रुतीचा मृतदेह आढळला. तिच्या गळ्याभोवती फासचे व्र्रण होते. तिच्यावर अत्याचार झाल्याचे, तसेच आरोपीने गळा आवळून तिचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे विभागात हळहळ व संताप व्यक्त केला जात आहे़ आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़