२७ तासानंतर शिरुरमधील तरुणाचा मृतदेह शोधण्यात पाणबुडीच्या पथकाला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 03:45 PM2017-12-23T15:45:19+5:302017-12-23T15:50:46+5:30
भिगवण-राशीन रोडवरील पुलावरून पडलेल्या तरुणाचा मृतदेह २७ तासा नंतर शोधण्यात पाणबुडीच्या पथकाला यश मिळाले. त्यामुळे २७ तास चाललेल्या शोध कार्याला विराम मिळाला.
भिगवण : भिगवण-राशीन रोडवरील पुलावरून पडलेल्या तरुणाचा मृतदेह २७ तासा नंतर शोधण्यात पाणबुडीच्या पथकाला यश मिळाले. त्यामुळे २७ तास चाललेल्या शोध कार्याला आणि नातेवाईकांच्या आपला माणूस पाहण्याच्या प्रक्रियेला विराम मिळाल्याचे याठिकाणी दिसून येत होते.
नितीन बबन भिसे (वय २१, रा. मलठण) हा ऊसतोड करणारा तरुण शुक्रवारी आपल्या आई-वडिलांना आणि मंडळीला भेटून गावाकडून कराड येथील साखर कारखान्यावर निघाला होता. भिगवण राशीन पुलावर आला असताना दुचाकीचा पुढील टायर फुटल्याने अपघात होवून लोखंडी खांबावर आदळून पाण्यात पडून त्याचा मृत्यू झाला. ज्या ठिकाणी नितीन पडला होता, त्याठिकाणी पाणी बरेच खोल असल्यामुळे भिगवण पोलिसांनी राबविलेल्या शोध पथकाला यश मिळत नव्हते. २४ तास उलटल्यानंतर इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी महाराष्ट्र अंडर वोटर सर्विसेस या पाणबुडी पथकाला पाचारण करीत घटनास्थळी थांबून राहत मदत कार्यात सहभाग घेतला. या पथकाचे मुख्य विजय दशरथ शिवतारे, नितीन काळंगे, किशोर काळंगे, स्वप्नील जराड यांच्या तीन तास चाललेल्या शोध कार्यामुळे अखेर नितीनचा मृतदेह मिळून आला. त्यामुळे २७ तास चाललेल्या शोधकार्याला अखेर विराम मिळाला.
यावेळी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नीलकंठ राठोड यांनी परिस्थितीवर लक्ष देत वाहतूक व्यवस्थाही चालू ठेवली होती. नितीनच्या घरच्यांनी घटनास्थळी पूर्ण रात्र जागून काढीत मृतदेह वर येण्याची वाट पाहिली. नागरिकांनी या वेळी गर्दी केली होती.
घटना घडल्यापासून घटनास्थळी लक्ष देत तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी मृतदेह सापडल्यावर महाराष्ट्र अंडर वोटर सर्विसेस पाणबुडी पथकाचे विजय शिवतारे आणि पूर्ण टीमचे आभार मानले.
घटना ज्यांच्या हलगर्जीपणामुळे घडली त्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी घटनास्थळाला भेट द्यायला सुद्धा आले नसल्यामुळे नागरिकांत या खात्याबाबत रोष दिसून आला.