तब्बल ३० वर्षांनंतर संरक्षण दलाचे तिन्ही प्रमुख एनडीएमध्ये एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:15 AM2021-08-22T04:15:12+5:302021-08-22T04:15:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तब्बल ३० वर्षांनंतर म्हणजेच १९९१ सालानंतर काल आणि आज असे दोन दिवस भारतीय संरक्षण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तब्बल ३० वर्षांनंतर म्हणजेच १९९१ सालानंतर काल आणि आज असे दोन दिवस भारतीय संरक्षण दलांचे तीनही प्रमुख, नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग, हवाईदलप्रमुख राकेश कुमार भदौरिया आणि लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) या आपल्या मातृसंस्थेला एकत्र भेट दिली. तिन्ही संरक्षण सेवांचे प्रशिक्षण देणाऱ्या या प्रबोधिनीसाठी हा एक ऐतिहासिक क्षण होता. भेटी दरम्यान त्यांनी एनडीएतील प्रशिक्षण सुविधांचा आढावा घेतला.
भारतीय लष्कर, नौदल आणि हवाईदलाच्या प्रमुखांनी, खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी या आपल्या मातृसंस्थेला २० आणि २१ ऑगस्टला एकत्र भेट दिली. तिन्ही संरक्षण सेवांचे प्रशिक्षण देणाऱ्या या सुप्रसिद्ध प्रबोधिनीसाठी हा ऐतिहासिक क्षण होता. देशाच्या तिन्ही संरक्षण दलांच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळणारे तीन ही अधिकारी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या ५६ व्या तुकडीचेच प्रशिक्षणार्थी होते. याआधी, १९९१ साली, तिन्ही सेवादलांचे प्रमुख एकाच तुकडीचे प्रशिक्षणार्थी म्हणून एनडीए (त्यावेळेचा सामाईक सेवा विभाग) येथे होते. प्रबोधिनीला एकत्रित भेट देण्यामागच्या उद्देश प्रबोधिनीमध्ये एकत्र शिकताना निर्माण झालेले मैत्रीबंध अधिक दृढ करण्याबरोबर तिन्ही दलांमधील सौहार्दाची, एकत्रितपणाची भावना अधिक दृढ करणे हा हेतू होता.
अॅडमिरल करमबीर सिंग यांनी नौदलप्रमुख म्हणून ३१ मे २०१९ रोजी कार्यभार स्वीकारला. राकेश कुमार भदौरिया यांनी ३० सप्टेंबर २०१९ रोजी हवाईदल प्रमुख म्हणून तर जनरल एम. एम. नरवणे यांनी लष्करप्रमुख म्हणून, ३१ डिसेंबर २०१९ रोजी पदभार स्वीकारला.
यावेळी तिन्ही सैन्यदलप्रमुखांच्यावतीने आपले मनोगत व्यक्त करताना नौदलप्रमुखांनी आधुनिक युद्धशास्त्राच्या नवनव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. आधुनिक लष्करी नेतृत्वाचे मूलभूत सिद्धांत समजून घ्यावे, असा सल्ला त्यांनी कॅडेट्सना दिला. सर्व प्रमुखांनी सध्या सुरू असलेल्या प्रशिक्षणाचा आणि प्रशिक्षणासाठीच्या पायाभूत सुविधांचा आढावाही घेतला.
आपल्या भेटीदरम्यान तिन्ही सैन्यदलप्रमुखांनी ‘हट ऑफ रिमेमबरन्स’ या शाहिद स्मृतिस्थळी श्रद्धांजली वाहिली. एनडीए संस्थेतून, प्रशिक्षित होऊन गेलेल्या, आणि कर्तव्य बजावताना वीरमरण पत्करलेल्या हुतात्मा अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ हे स्मृतिस्थळ तयार करण्यात आले आहे.
चौकट
भेटीचे महत्त्व :
एनडीएमध्ये मुलींना प्रवेश देण्याबाबत सर्वोच्च न्यायलायाने नुकत्याच केलेल्या वक्तव्यानंतर तिन्ही सैन्यदल प्रमुखांनी एकत्रितपणे प्रबोधिनीला दिलेल्या भेटील विशेष महत्त्व दिले जात आहे. यामुळे आगामी काळात एनडीएमध्ये मुलींना प्रवेश देण्याच्या दृष्टीने सकारात्मक विचारासोबतच याबाबतच्या कामांना गती मिळण्याची शक्यता असल्याचे मत संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
-------
फोटो ओळ : सुदान ब्लाॅकसमोर तिन्ही सैन्यदल प्रमुख.
फोटो - सुदान ब्लाॅक