तब्बल 33दिवसांनी गौतम पाषाणकर जयपूर ला सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:26 AM2020-11-26T04:26:30+5:302020-11-26T04:26:30+5:30
पुणे : अॅटोमोबाईल क्षेत्राती उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध लावण्यात पुणे पोलिसांना तब्बल ३३ दिवसांनंतर यश आले आहे़ जयपूरमधील ...
पुणे : अॅटोमोबाईल क्षेत्राती उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध लावण्यात पुणे पोलिसांना तब्बल ३३ दिवसांनंतर यश आले आहे़ जयपूरमधील एका हॉटेलमध्ये ते पुणे पोलिसांच्या पथकाला सापडले आहेत.
गौतम पाषाणकर हे गेल्या २१ आॅक्टोंबर रोजी सायंकाळी गणेशखिंड रोडवरील आपल्या घरासमोरुन चालकाला घरी जातो, असे सांगून निघून गेले होते़ त्यांनी आपण व्यवसायात मोठे आर्थिक नुकसान झाल्याने आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी चालकाजवळ दिली होती़ पोलिसांनी हरविल्याची तक्रार दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला होता़
गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पथक त्यांचा शोध घेत होते़ पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले यांना बातमीदारांकडून ते जयपूर येथे असल्याचे समजले़ पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड व त्यांचे सहकारी तातडीने जयपूरला रवाना झाले़ त्यांनी तेथील एका हॉटेलमध्ये जाऊन गौतम पाषाणकर यांना मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यात घेतले असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले़
गौतम पाषाणकर हे २१ आॅक्टोंबर रोजी घरासमोरुन बाहेर पडल्यावर ते थेट स्वारगेटला आले होते़ तेथून त्यांनी भाड्याची एक कार ठरविली व ते कोल्हापूरला गेले होते़ हे समजल्यावर पुणे पोलीस कोल्हापूरला पोहचले होते़ तेथील तारा राणी चौकात ते कारमधून उतरल्याचे व एका हॉटेलमधून पार्सल घेतल्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते़ त्यानंतर ते कोकणात गेल्याचे दिसून आले़ मात्र, त्यानंतर त्यांचा शोध लागला नव्हता़ जवळपास ३३ दिवसांनंतर पोलिसांना पाषाणकरांचा शोध लागला आहे़
पुण्यातून पाषाणकर कोल्हापूर, तेथून कोईमतूर, बंगलोर, दिल्ली व त्यानंतर जयपूरला गेले असल्याचे समजले. त्यांनी हा प्रवास रेल्वेने केला. त्यांच्याकडे काही पैसे होते. इतरांनी त्याना पैसे पुरवले असतील. पुण्यात आल्यावर चौकशीनंतर ते स्पष्ट होईल, असे गुप्ता यांनी सांगितले.
.......
कोरोनाचे संकट असताना व कोणताही गुन्हा नसताना गौतम पाषाणकर यांच्या निघून जाण्याने पोलीस पथक गेले अनेक दिवस त्यांच्या शोधामध्ये गुंतून पडले होते़ उद्या सायंकाळपर्यंत पोलीस त्यांना घेऊन पुण्यात येईल़
अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त.