सलग ८ दिवसांच्या तयारीनंतर PM मोदींचा दौरा सुखरुप पार पडला; पोलिसांनी घेतला मोकळा श्वास
By विवेक भुसे | Published: August 1, 2023 08:40 PM2023-08-01T20:40:46+5:302023-08-01T21:09:35+5:30
दोन फरार दहशतवादी सापडल्याने पंतप्रधानांचा दौरा आणखीन संवेदनशील बनला होता
पुणे : एकाच वेळी ३ ठिकाणी कार्यक्रम, छोटे छोटे रस्ते, या रस्त्यांवर पंतप्रधानांना पाहण्याची होणारी मोठी गर्दी, त्यातून अतिउत्साही लोकांना आवरण्यासाठी करावी लागणारी कसरत, आधीच वाहतूक कोंडीने वैतागलेले पुणेकर यांचा सामना करीत कडक बंदाेबस्तात दौरा निर्विह्न पार पडल्याने पोलिसांनी मोकळा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त शहरातील मध्य भागाला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. चौकाचौकात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा पुणे दौरा ठरल्यानंतर गेल्या ८ दिवसांपासून शहर पोलिस रात्रंदिवस बंदोबस्ताच्या आखणीत गुंतवले होते. गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी लागोपाठ कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यातच दोन फरार दहशतवादी सापडल्याने पंतप्रधानांचा दौरा आणखीन संवेदनशील बनला होता.
रस्ते निर्मनुष्य
मेट्रोच्या कामांमुळे निम्मे झालेले रस्ते, त्यात खड्ड्यांनी कमी झालेला वाहतूकीचा वेग, त्यावर कडी म्हणून पंतप्रधानाच्या दौर्यामुळे करावी लागणारी रंगीत तालीम यामुळे होणारी वाहतूक कोंडी अशी परिस्थिती पुणेकर गेले दोन दिवस अनुभवत होते. त्यात सकाळपासून रस्ते बंद राहणार याची सोशल मिडियावरुन झालेली चुकीची व्हायरल यामुळे आज ज्यांना अत्यावश्यक कामे नव्हती, अशा पुणेकरांनी घरीच राहणे पंसत केले. त्यात पंतप्रधान यांच्या जाण्याच्या रस्त्यावरील सर्व दुकाने, टपर्या बंद केल्या असल्याने अनेक रस्ते सकाळी निर्मनुष्य झालेले दिसून येत होते. त्याचवेळी मोदी यांच्या मार्गावर अनेक नागरिक स्वागतासाठी पावसातही उभे होते. बेलबाग चौक, संभाजी चौक, स. प. महाविदयालय चौक, गुडलक चौक, फर्ग्युसन रोड परिसरात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांची गर्दी दिसत होती. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला बॅरिकेटच्या बाहेर थांबून मोदी-मोदी असा जयघोष करीत पंतप्रधानांचे स्वागत केले. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करीत रस्त्यावर येण्याचे टाळले. मध्यभागातील उंच इमारतींच्या छतांवर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पुणे पोलीस दलातील ३ हजार पोलीस कर्मचारी, तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. बाहेरच्या जिल्ह्यातील जवळपास ३ हजारांहून अधिक बंदोबस्त मागविण्यात आला होता. तर एसपीजी, फोर्स वन आणि एसआपीएफच्या तुकड्या बंदोबस्तासाठी होत्या.
''पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनी अहोरात्र मेहनत घेतली. अनेक गैरसोयी होत असतानाही पुणेकरांनी संपूर्ण सहकार्य केले. त्यामुळे अतिशय मोठा असलेला हा बंदोबस्त निविघ्न पार पडला. त्याबद्दल सर्व पुणेकरांचे आभार. - रितेशकुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर''