...अखेर एक वर्षानंतर चिमुकली विसावली आईच्या कुशीत !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 11:05 AM2022-04-29T11:05:48+5:302022-04-29T11:10:42+5:30
पुणे : महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मर्यादेची सीमा ओलांडल्यामुळे लग्नाआधीच आई बाबा झाले. घरच्यांचा ...
पुणे : महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मर्यादेची सीमा ओलांडल्यामुळे लग्नाआधीच आई बाबा झाले. घरच्यांचा विरोध होईल, या भीतीतून त्यांनी मुलीला दुसऱ्याच्या नावावर जन्म देण्याचे ठरवत लग्नानंतर मुलीला आणण्याचे ठरविले.
दरम्यान, मुलीचे अपहरण होऊन ती एका संस्थेच्या ताब्यात गेली. त्यानंतर आईने एक वर्षांहून अधिक काळ न्यायालयीन लढा दिला. राहुल व माधुरी (नाव बदलेली आहे) अशी त्यांची नावे आहेत. माधुरीने १७ ऑक्टोबर २०२० रोजी चाकण येथील रुग्णालयात एका चिमुकलीला जन्म दिला. त्यांनी ते बाळ मूलबाळ नसलेले त्यांचे मित्राकडे सांभाळण्यास दिले.
मुलगी काही दिवस सांभाळल्यानंतर पुन्हा परत देण्याचे आश्वासन संबंधित दाम्पत्याने राहुल व माधुरीला दिले. यादरम्यान त्या चिमुकलीचे अपहरण झाले. काही कालावधीनंतर मुलीचे अपहरण केलेल्या महिलेला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा ताबा आळंदी रस्ता वडमुखवाडी चोली येथील रेणुका शिशुगृहाकडे दिला.
आपली मुलगी शिशुगृहात असल्याचे कळाल्यानंतर राहुल व माधुरी यांनी मुलीचा ताबा घेण्यासाठी बालकल्याण समिती, येरवडा यांकडे अर्ज केला. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेशिवाय ताबा देण्यास संस्थेने नकार दिला. त्यानंतर, तिने अॅड. सोपान पाटील व अॅड. मनिष ननावरे यामार्फत न्यायालयात अर्ज केला. तिथे त्यांना न्याय मिळाला.