मुठेची महाआरती करुन तिच्या पुनरुज्जीवनाचा पुणेकरांनी केला निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 08:54 PM2019-02-12T20:54:03+5:302019-02-12T20:55:07+5:30
नर्मदा जयंतीनिमित्त नर्मदेचे पाणी मुठा पात्रात साेडून तसेच मुठेची महाआरती करुन तिच्या पुनरुज्जीवनाचा निर्धार पुणेकरांनी केला.
पुणे : नर्मदा जयंतीनिमित्त नर्मदेचे पाणी मुठा पात्रात साेडून तसेच मुठेची महाआरती करुन तिच्या पुनरुज्जीवनाचा निर्धार पुणेकरांनी केला. यावेळी मुठेची आरती करण्यासाठी शेकडाे पुणेकर उपस्थित हाेते.
नर्मदा जयंतीनिमित्त निनाद पुणे, पुणे महानगरपालिका, कलातीर्थ, ग्रंथ पारायण दिंडीतर्फे आमची मुठा आमची नर्मदा अंतर्गत मुठा पुनरुज्जीवन अभियान या कार्यक्रमाचे आयोजन भिडे पूल येथील नदीपात्रात करण्यात आले होते. यावेळी फुलगांव येथील प.पू.स्वामी स्वरुपानंद सरस्वती, भालोद येथील प.पू.प्रतापे महाराज, नर्मदा परिक्रमावासीयांची अविरत सेवा करणा-या मंगलेश्वर येथील पूज्य ज्योतीबेन पंडया, शूलपाणी येथील हिरालाल रावत, निनाद पुणेचे अध्यक्ष उदय जोशी, विरेंद्र कुंटे, अमोल काळे, सुनील केसरी, ज्ञानेश्वर मोळक, शुभदा जोशी यांसह निनाद पुणे व निनाद पतसंस्थेचे सर्व संचालक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
नमामी देवी नर्मदे ही प्रार्थना म्हणत यावेळी पुजा करण्यात आली. तसेच मुठा नदीला पुन्हा तिच्या मुळ स्वरुपात आणण्याचा निर्धार करण्यात आला. मुठा-पुनरुज्जीवन अभियानाच्यानिमित्ताने मुठा नदी स्वच्छ रहावी यासाठी हातभार लावणार असल्याची शपथ पुणेकरांनी घेतली. तुला स्वच्छ करुन पुन: तुझे पाणी पिण्यायोग्य होईल, असा मनोदय यानिमित्ताने करीत पुणेकरांनी मुठेची आरती केली. लक्ष लक्ष दिव्यांनी मुठा नदीचा परिसर उजळून तर निघालाच, पण त्यासोबतच नर्मदा नदी आणि मूळ मुठेच्या उगमाचे पवित्र पाणी सत्वहिन झालेल्या मुठा नदीमध्ये सोडून नर्मदे हर हर... चा निनाद करण्यात आला.