वारजे येथील अपघातानंतर पीएमपीला खडबडून जाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 07:58 PM2018-07-03T19:58:21+5:302018-07-03T20:04:12+5:30
ठेकेदारांकडील बसेसच्या देखभाल-दुरूस्तीचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. पण प्रशासनाकडून दरवेळी तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई करून त्याकडे डोळेझाक केली जाते.
पुणे : वारजे येथे पीएमपी बस पुलावरुन कोसळली. या अपघातानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळ खडबडून जागे झाले आहे. ठेकेदारांकडून सर्व बसेसची कसून तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. या तपासणी मोहिमेला मंगळवारपासून सुरूवात करण्यात आली. यामध्ये एका ठेकेदाराच्या नियमितपणे मार्गावर येणाऱ्या १५ ते २० बस देखभाल-दुरूस्ती अभावी सोडण्यात आल्या नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबई-पुणे महामार्गावर वारजेला जाणाऱ्या जोड रस्त्यावर सोमवारी (दि. २ जुलै) पीएमपीची बस २० फुट खड्डयात कोसळली. या बसमध्ये असलेल्या ३२ पैकी २० प्रवासी जखमी झाले आ हेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या अपघाताने पीएमपी प्रशासनाला जाग आणली आहे. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने सोमवारपासूनच तातडीने पावले उचलण्यास सुरूवात केली. पीएमपीने पाच ठेकेदारांकडून ६५३ बस भाडेतत्वावर घेतल्या आहेत. यापैकी ६० ते ७० बस बंदच असतात. सुमारे ५८८ बस मार्गावर धावण्यायोग्य असून त्यापैकीही दररोज सरासरी सुमारे ४५० बस मार्गावर सोडल्या जातात. या बसेसमध्येही ब्रेकडाऊनचे प्रमाण अधिक आहे. तसेच छोटे-मोठे अपघातही सातत्याने होतात. सोमवारी झालेल्या अपघातामध्ये बसच्या स्टेअरिंगचा रॉड निसटल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. त्यामुळे या बसेसच्या देखभाल-दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते.
ठेकेदारांकडील बसेसच्या देखभाल-दुरूस्तीचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. पण प्रशासनाकडून दरवेळी तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई करून त्याकडे डोळेझाक केली जाते. या अपघातानंतर प्रशासन काहीसे गंभीर असून बुधवारपासून सर्व बसेसची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बसेसची नियमित देखभाल-दुरूस्ती केली जाते का, आरटीओ पासिंग, दर दहा दिवसांनी होणाऱ्या तपासण्या, सर्व्हिसिंग, ब्रेक, क्लच, गिअर, स्टेअरिंग, टायर या महत्वाच्या बाबींकडेही प्रामुख्याने लक्ष दिले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक आगारामध्ये स्वतंत्र टीम तयार करण्यात आली आहे. आगारामध्ये ठेकेदारांच्या जेवढ्या गाड्या येतील, त्या सर्व गाड्यांची संपूर्ण तपासणी करूनच मार्गावर सोडण्यात येणार आहेत. ज्या गाडीमध्ये दोष आढळेल, ती गाडी मार्गावर सोडण्यात येणार नाही. याबाबत सर्व ठेकेदार तसेच आगार प्रमुखांना सुचना देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाºयांनी दिली.