Pune News: अखेर जयहिंद चित्रपटगृह जमीनदोस्त; पुणे-मुंबई रस्त्यावरचा बॉटलनेक दूर
By निलेश राऊत | Published: May 25, 2024 06:39 PM2024-05-25T18:39:18+5:302024-05-25T18:39:46+5:30
शुक्रवारी दुपारपासून मध्यरात्रीपर्यंत चित्रपटगृहाची इमारत महापालिकेने जमीनदोस्त केली...
पुणे :पुणे-मुंबई रस्त्यावरील खडकी रेल्वेस्टेशनसमाेरचे जयहिंद चित्रपटगृह, तसेच कॅफे पंजाब रेस्टॉरंटची २ हजार ५२६ चौरस मीटर क्षेत्र जागा महापालिकेच्या ताब्यात आली आहे. शुक्रवारी दुपारपासून मध्यरात्रीपर्यंत चित्रपटगृहाची इमारत महापालिकेने जमीनदोस्त केली. यामुळे या ठिकाणी असलेला बॉटलनेक हटविण्यात आला आहे.
महापालिकेच्या पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी याबाबत माहिती दिली. पुणे महापालिकेच्या हद्दीत, पुणे-मुंबई रस्ता हा विकास आराखड्यानुसार ४२ मीटर रुंदीचा करण्याचे काम पथविभागामार्फत सुरू आहे. यामध्ये २.२ किलोमीटर रस्ता, खडकी कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतील रस्ता देखील ४२ मीटर रुंदीचा करण्यात येत होता. मात्र, खडकी रेल्वेस्टेशनसमोरील जयहिंद चित्रपट कॅफे पंजाब रेस्टॉरंट येथील रुंदीकरण येथील पोटभाडेकरू उच्च न्यायायलात गेल्याने हे काम रखडले होते. २४ एप्रिल रोजी याबाबतचा निकाल पुणे महापालिकेच्या बाजूने लागला. यानंतर महापालिकेने न्यायालयाच्या सूचनेनुसार मोबदला म्हणून ४३ लाख रुपये न्यायालयात जमा केले. त्यानंतर डिफेन्स इस्टेट ऑफिसरच्या कार्यालयाशी संपर्क साधून, ही जागा तातडीने ताब्यात घेण्यासाठी पाठपुरावा केला.
दि. २४ मे रोजी डिफेन्सचे भाडेकरू प्रॉव्हिडन्स प्रॉपर्टीज यांच्याकडून तसेच डिफेन्स इस्टेट ऑफिसरच्या कार्यालयाच्या स्वाक्षरीने या मिळकतीचा ताबा महापालिकेने घेतला. जयहिंद चित्रपटगृह व रेस्टॉरंटच्या इमारतींचे पाडकामाचे काम पथविभागामार्फत हाती घेण्यात आले. शुक्रवारी मध्यरात्री जॉ कटरच्या साहाय्याने जयहिंद सिनेमाची इमारत जमीनदोस्त करण्यात आली.
आता ही जागा मोकळी झाल्याने येथे त्वरित काँक्रीट रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असून, ते तीन आठवड्यांत पूर्ण होईल, असे पावसकर यांनी सांगितले. सुमारे १४० मीटर लांबीचा व १५ मीटर रुंदीची काँक्रीटची पट्टी तेथे करण्यात येणार आहे. यामुळे पुणे महापालिकेच्या हद्दीतील एकमेव शिल्लक असलेला बॉटलनेक आता होणार असून, वाहनचालकांना मोठा रस्ता येथे मिळणार आहे. या कार्यवाहीत पावसकर यांच्यासह अधीक्षक अभियंता अमर शिंदे, कार्यकारी अभियंता दिलीप पावरा, उपअभियंता गाठे व कनिष्ठ अभियंता देवडकर सहभागी झाले होते.