...अखेर आकाशवाणीवर लतादीदींचे दररोज गाणे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 03:48 AM2018-10-31T03:48:19+5:302018-10-31T03:49:11+5:30
पूना गेस्ट हाऊस आणि बियाँड एन्टरटेंमेंट यांच्या वतीने भारतरत्न लता मंगेशकर यांच्या ९०व्या वर्षातील पदार्पणानिमित्त त्यांच्या मराठी गीतांवर आधारित ‘मोगरा फुलला’ या विशेष दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे : लतादीदींनी गायलेले ‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला... वैभवाने बहरून आला, याल का हो बघायला,’ हे भावगीत त्या काळात इतके लोकप्रिय झाले, की आकाशवाणीला या गीतासाठी रोज हजारो पत्रे येत असत. त्यामुळे शेवटी आकाशवाणीने हे गाणे दररोज लावण्याचे निश्चित केले. या गीताचे स्वर ऐकले की कोणाच्याही डोळ्यांतून पाणी आल्याशिवाय राहत नाही... अशी अनेक गीते आपल्या सुरेल आवाजाने सजविणाऱ्या लतादीदींच्या आठवणी चित्रपट विश्लेषक व लेखिका सुलभा तेरणीकर यांनी उलगडल्या.
पूना गेस्ट हाऊस आणि बियाँड एन्टरटेंमेंट यांच्या वतीने भारतरत्न लता मंगेशकर यांच्या ९०व्या वर्षातील पदार्पणानिमित्त त्यांच्या मराठी गीतांवर आधारित ‘मोगरा फुलला’ या विशेष दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चित्रपट विश्लेषक व लेखिका सुलभा तेरणीकर आणि त्यांच्या सहकारी वंदना कुलकर्णी व उस्मान शेख यांनी कार्यक्रम सादर केला. किशोर सरपोतदार यांनी संयोजन केले.
सुलभा तेरणीकर म्हणाल्या, गानकोकिळा लता मंगेशकर या जितक्या विलक्षण गायिका होत्या, तितकेच त्यांचे संगीत दिग्दर्शनदेखील अद्भुत होते. संगीत दिग्दर्शनात जेव्हा त्यांनी स्वत:ला अजमावले, तेव्हा संगीतावरील असीम निष्ठेमुळे त्यात त्या यशस्वीदेखील झाल्या. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या प्रत्येक गाण्यामध्ये कमालीचा गोडवा आहे. त्यांची गाणी काळजाच्या कोपºयात जाऊन कायमची विसावतात. लतादीदींचे पुण्याशी अतूट नाते आहे. मोठा काळ त्यांचे पुण्यात वास्तव्य होते. त्यामुळे त्यांचे पुण्याशी जुने नाते असल्याचेही त्यांनी सांगितले.
...अन् गाण्यांविषयीच्या आठवणी श्रोत्यांसमोर
लता मंगेशकर यांनी गायिलेली मी कात टाकली...जा मुली दिल्या घरी सुखी रहा...नववधू प्रिया मी बावरले...कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला...धुंद मधुमती रात रे...प्रेमा काय देऊ तुला...आली हसत पहिली रात... ही अजरामर गीते या वेळी सादर करण्यात आले. या प्रत्येक गीताशी निगडित लतादीदींच्या आठवणी या वेळी तेरणीकर यांनी श्रोत्यांना सांगितल्या.